कोलकता : प. बंगालची राजधानी कोलकत्यात सुमारे १५० वर्षांपासून सुरू असलेली ट्राम सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोलकत्यातील मोठे सार्वजनिक उद्यान व हिरवळीचे क्षेत्र असलेल्या मैदान ते एस्प्लेनड या वारसा भागातील अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणची ट्रामसेवा बंद होईल, अशी माहिती राज्याचे वाहतूक मंत्री स्नेहाशिषचक्रवर्ती यांनी दिली. देशात फक्त कोलकत्यातच अजून ट्रामसेवा सुरू आहे.
या निर्णयामुळे ट्रामप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी कोलकत्यातील रस्त्यांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल माहिती देताना चक्रवर्ती म्हणाले, की रस्त्याच्या बाजूने संथ गतीने जाणाऱ्या ट्राममुळे गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होते.
सध्याच्या काळात नागरिकांना जलद वाहतुकीची गरज असल्याने ट्राम सुरू ठेवता येऊ शकत नाही. कोलकत्याच्या वैभवशाली वारशाचा ट्राम नि:संशयपणे अविभाज्य भाग आहे. इ.स. १८७३ मध्ये घोडागाडीच्या रूपात सुरू झालेल्या ट्रामने याआधीच्या शतकात वाहतुकीत मोलाची भूमिका बजावली.
मात्र, कोलकत्यातील एकूण जमिनीच्या क्षेत्रफळांपैकी रस्त्यांचे क्षेत्रफळ अवघे सहा टक्के असून वाहतूकही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकाचवेळी ट्राम इतर वाहनांसोबत रस्त्याच्या बाजूने धावू शकत नाही, असे निरीक्षण आम्ही नोंदविले, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, की ट्रामचा मुद्दा कलकत्ता उच्च न्यायालयात प्रलंबित असून राज्य सरकार पुढील सुनावणीत आपले निवेदन सादर करेल. कोलकत्यातील मैदान ते एस्प्लेनड या वारसा भागात ट्रामसेवा सुरूच राहणार असून या ठिकाणी लोकांना ट्रामच्या सुखद प्रवासाचा अनुभव घेता येईल.
दरम्यान, ट्रामप्रेमींनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. कलकत्ता ट्राम युझर्स असोसिएशनने या निर्णयाविरुद्ध ट्रामच्या पाच डेपोंपुढे निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
महानगरांपैकी कोलकत्यात रस्त्यांसाठी सर्वांत कमी जागा उपलब्ध आहे. वाहतूक कोंडी टाळून लोकांना वेळेवर कार्यालयात जाता येण्यासाठी आम्हाला ट्राम सेवा बंद करण्यासह अन्य काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील.
- स्नेहाशिष चक्रवर्ती वाहतूक मंत्री, प. बंगाल
आम्ही ट्रामसेवा बंद होऊ देणार नाही. राज्य सरकारला वाहतूक कोंडीचे गांभीर्य असेल तर अतिक्रमणे हटवून रस्ते रुंद करावेत. शहरातील वाहतुकीचा सरासरी वेगही एवढाच आहे.
- कौशिक दास पर्यावरणवादी कार्यकर्ते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.