नवी दिल्ली - दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्र -एनसीआरमध्ये दिवाळीनंतर अतिघातक अवस्थेत पोचलेल्या जीवघेण्या हवेच्या प्रदूषणाला आज सकाळी वाऱ्यामुळे अल्पकाळ व अत्यल्प विराम लागला. दरम्यान, दिल्लीतील प्रदूषणावरून सत्तारुढ आप आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकीय फटाके फुटू लागले आहेत.
भाजप नेत्यांनी फटाके उडवण्यासाठी उघड चिथावणी दिल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. तर दिल्लीचे प्रदूषण हा राजकारणाचा विषय नसून दिल्लीकरांना जिवंत ठेवण्यासाठी केंद्र सरकार तसेच दिल्ली आणि शेजारच्या राज्यांमधील सर्व पक्ष आणि सरकारांनी वेळ निघून जाण्याआधीच गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे, असे पर्यावरणतज्ज्ञांनी बजावले आहे.
दिल्लीत यंदा दिवाळीतबंदी झुगारून झालेल्या फटाकेबाजीमुळे गेल्या पाच वर्षातील सर्वात गंभीर प्रदूषणाची समस्या उद्भवली. तथापि आज सकाळी दिल्लीत जोरदार वारे वाहिले. त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक शुक्रवारच्या ४६२ अंकांवरुन ४४९ पर्यंत किंचित सुधारला, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने सांगितले. मात्र अजूनही दिल्ली ‘एनसीआर’ची आणि ‘एनसीआर’ परिसराची हवा अतिविषारी किंवा अतिघातक याच श्रेणीत मोडत आहे. ऐतिहासिक ताजमहालही आज सकाळी धुक्याच्या दाट चादरीने वेढून गेला आणि १०० मीटरवरूनही ताजमहाल दिसणे दुरापास्त झाले.
‘आप’चे नेते काय म्हणतात
‘आप’ने वाढत्या प्रदूषणाबद्दल भाजपला जबाबदार धरले. केजरीवाल सरकारला बदनाम करण्यासाठीच दिल्लीत फटाकाबंदी मोडण्याचे आवाहन भाजप खासदार आणि नेत्यांनी जाहीरपणे केले असा गंभीर आरोप पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केला.
भाजप नेत्याचे बोल
केजरीवाल सरकारवर टीका करताना कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले स्मॉग टॉवर्स कुचकामी ठरल्याचा आणि केजरीवाल सरकारने फक्त जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजप नेते श्याम जाजू यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.