नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परीक्षेत्रातील (एनसीआर) वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले असून वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४०० ते ५०० च्या म्हणजे अतीगंभीर स्थितीत पोहोचला आहे. दिल्लीच्या हवेतील ‘स्मॉग' चा विळखा घट्ट झाला असून नागरिकांना कालपासून श्वास घेणेही कठीण झाले आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) दिल्ली सरकारला प्रदूषणाची परिस्थिती सुधारेपर्यंत शाळा बंद ठेवण्याची सूचना केली आहे. आयोगाने दिल्ली सरकारला नोटीस पाठवून २४ तासांत उत्तर मागितले आहे. एकूण परिस्थिती पहाता पुढील आठवडाभर शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय दिल्ली सरकारकडून कधीही घोषित होऊ शकतो.
भाजप नेत्यांनी प्रदूषणाच्या विषारी विळख्याबद्दल आप सरकारवर आरोप केले आहेत. दुसरीकडे भाजप खासदार वरुण गांधी यांनीही फटाक्यांच्या धुरामुळे वाढलेल्या प्रदूषणाचा उल्लेख करून, ‘आपल्याच लोकांना विष देण्याचे वार्षिक प्रकार बंद व्हायला हवे,‘ या शब्दांत घरचा आहेर दिला आहे. दिल्लीवरील या वार्षिक संकटावर ठोस उपाययोजना सापडत नसताना, भाजप आणि आप यांच्यातील राजकीय कलगीतुऱ्यालाही नेहमीप्रमाणे उत आला आहे.
‘एनसीपीसीआर’चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी सांगितले, की दिल्लीतील प्रदूषणाच्या चिंताजनक पातळीवर पोचले असून या वातावरणात अस्थमासारखे विकार असणारे रुग्ण व शाळकरी मुलांची सुरक्षा ही चिंताजनक गोष्ट आहे. शाळा बंद ठेवण्याबाबत दिल्ली सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्रदूषणाची चिंताजनक पातळी असूनही, दिल्लीत अजूनही शाळा सुरू आहेत, त्यासंदर्भात आयोगाने दिल्ली सरकारला नोटीस पाठवली आहे.
ऑनलाइन शिक्षण घ्या
शाळेतील मुलांना राजधानीतल गंभीर वायू प्रदूषणापासून वाचवण्यासाठी शारीरिक वर्गांसाठी शाळा बंद करून ऑनलाइन शिक्षण घेण्याची भाजपने मागणी केली आहे. दिल्लीच्या नायब राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी म्हटले आहे, की दिल्लीतील प्रदूषण अत्यंत गंभीर पातळीवर पोचल्यामुळे शालेय मुलांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे. मोकळ्या मैदानात किंवा घराबाहेर अशा तीव्र प्रदूषणात पाठवल्याने मुले मोठ्या संख्येने श्वसनविकारांनी ग्रस्त आहेत.
वरुण यांचा आरोप
भाजप खासदार वरुण गांधी यांनी प्रदूषणावर चिंता व्यक्त करताना प्रदूषणाच्या संकटाशी निगडित सरकारी यंत्रणांमधील चिंता आणि समन्वयाच्या अभावावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. श्वास, हृदय आणि फुफ्फुस विकारांच्या रुग्णांनी रुग्णालये भरलेली असताना सरकार किंवा जनताही या जीवघेण्या समस्येबद्दल गंभीर नाही. वरुण गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की दिल्ली-एनसीआरमधील १० पैकी ८ मुलांना श्वसनाचा त्रास आहे. फटाक्यांच्या वापराच्या घटना वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘आप जबाबदार’
भाजप नेते विजय गोयल यांनीही दिल्लीतील जीवघेण्या प्रदूषणासाठी आप सरकारला जबाबदार धरताना, जंतरमंतर वर एका दिवसाच्या उपवास आंदोलनाचा इशारा दिला. गोयल यांनी चक्क अण्णा हजारे यांचे छायाचित्र ठेवून त्यासमोर हे आंदोलन करण्याचे जाहीर केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.