नवी दिल्ली- दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी विकिपीडियाला चांगलेच फटकारले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने विकिपीडिया विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी सुरु होती. यावर बोलताना कोर्टाने विकिपीडियाला सुनावलं आहे. तुम्हाला भारत आवडत नसेल, तर तुम्ही भारतातून निघून जा, असं न्यायमूर्ती नवीन चावला म्हणाले आहेत.
विकिपीडियाने आपल्या पेजवर एएनआय संबंधी चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी एएनआयने हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. याप्रकरणी विकिपीडियावर मजकुरामध्ये दुरुस्ती करणाऱ्या तीन व्यक्तींची नावे देण्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता. मात्र, विकिपीडियाने ही माहिती देण्याचे टाळले होते. त्यामुळे एएनआयने पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी कोर्टाने अवमान याचिका दाखल करून घेतली आहे.