दिल्लीतील मराठी मंत्री हा महाराष्ट्राचा राजदूत; नितीन गडकरी

आपण दिल्लीत येण्यास अजिबात तयार नव्हतो. आपल्याला जबरदस्तीने दिल्लीत पाठविण्यात आले, याचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSakal
Updated on

नवी दिल्ली - आपण दिल्लीत (Delhi) येण्यास अजिबात तयार नव्हतो. आपल्याला जबरदस्तीने दिल्लीत पाठविण्यात आले, याचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला आहे. दिल्लीत केंद्रीय मात्र म्हणजे महाराष्ट्राचे प्रश्न सोडविणारा राज्याचा राजदूतच (Ambassador) असतो, असाही सल्ला त्यांनी केंद्रातील मराठी मंत्र्यांना दिला आहे. (Delhi Marathi Minister Maharashtra Ambassador Nitin Gadkari)

नरेंद्र मोदी सरकारमधील नवीन मराठी मंत्र्यांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते नुकताच नवीन महाराष्ट्र सदनात झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड व कपिल पाटील या राज्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचा हा कार्यक्रम होता. गडकरी यांनी दिलखुलासपणे कार्यक्रमात रंग भरले.

Nitin Gadkari
शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणारं 'हे' ठरलं देशातील पहिलंच शहर

गडकरी २००९ च्या अखेरीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्वप्रथम दिल्लीत आले त्या क्षणापासून, आपल्याला दिल्ली बिलकूल आवडत नाही, हे त्यांचे मत ठाम आहे. तथापि त्यांना तत्कालीन भाजप नेतृत्व किंवा संघ नेतृत्व यापैकी कोणी दिल्लीत येण्यासाठी जबरदस्ती केली हे त्यांनी आजतागायत स्पष्ट केलेले नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी माझी अनेक स्वप्ने आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले की आपल्या महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा विकास झाला पाहिजे हाच प्रयत्न राहिला आहे. तुम्हाला काम करताना दिल्लीत काही अडचणी आल्या तर मला सांगा. दिल्लीत माझा शब्द ऐकत नाही असा अधिकारी नाही, असेही ते म्हणाले. दानवे यांच्याकडे रेल्वेसारखे महत्त्वाचे खाते आले आहे.

अन्य नवीन मंत्र्यांपैकी सर्वस्वी भाजपचे असलेले एकमेव डॉ. कराड यांना औरंगाबादचे महापौर बनविण्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आपण कसा शब्द टाकला होता, राणे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते असताना त्यांची प्रशासनावरील पकड कशी होती हेही गडकरी यांनी सांगितले. दिल्लीत मंत्री म्हणून काम करताना देशासाठी तर काम करायचे आहेच, पण आपल्या मतदारसंघासाठी, विभागासाठी व महाराष्ट्रासाठी काम करण्याची ही उत्तम संधी आहे आणि तिचा वापर करून घ्या, असाही सल्ला त्यांनी नवीन मंत्र्यांना दिला. पुढचे पाऊल व दिल्लीतील मराठी संस्थांच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमाचे संचालन निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

Nitin Gadkari
उपग्रहांमार्फत होणार ईशान्येकडील राज्यांची सीमानिश्चिती; केंद्राचा निर्णय

महाराष्ट्र सदनाशी भावनिक नाते

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनाची जागा राज्याच्या ताब्यात मिळाली आणि ती सर्वस्वी गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे. गडकरी एकदा दिल्लीत आले असताना या ओसाड जागेवर आले व तेथील सिरमौरच्या राजघराण्याच्या मालकीचा नामफलक त्यांनी लाथ मारून कसा उडविला याच्या आठवणी, सदनातील जुने अधिकारी आजही सांगतात. तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री राम जेठमलानी यांच्याकडे गडकरी यांनी प्रभावी युक्तिवाद केला व ही जागा राज्याचीच असल्याचा जेठमलानी यांनी निर्णय दिला होता. दिल्लीत या वास्तूशी आपले भावनिक नाते असल्याचेही, गडकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.