दिल्लीची दादगिरी चालणार नाही: ममता बॅनर्जी
पणजी : ''मी इथे तुमची सत्ता हिसकावण्यासाठी आले नाही, तर तुम्हाला मदत करायला आले आहे, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोवेकरांना साद घातली. मी हिंदूच असून भाजपने मला जातीचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, असाही घणाघात ममतादीदींनी भाजपवर केला. दिल्लीची दादागिरी राज्यांवर चालणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नफिसा अली, मृणालिनी देशप्रभू, माजी टेनिसपटू लिएंडर पेस यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. आज गोव्यातील पक्ष नेत्यांशी बोलताना त्या म्हणाल्या, आम्हाला संघीय संरचना मजबूत हवी आहे. गोव्याची संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी आम्हाला संपूर्ण सुरक्षा द्यायची आहे. आपण ताठ मानेने जगावे, अभिमानाने जगावे अशी इच्छा आहे. माझ्या धर्माचे प्रमाणपत्र भाजपने देऊ नये. मी अभिमानास्पद हिंदू आहे, असेही नमूद केले. आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणूका लढवतो, मात्र भाजप निवडणुकीच्या काळात दंगे घडवून आणते, असा आरोप केला. विकासाच्या नावावर सरकार गोव्यातील लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील मच्छीमार बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मात्र दिल्ली गोव्याला आपल्या तालावर नाचवत आहे. आम्हाला भविष्यातील गोव्याला प्रभावशाली राज्य बनवायचे आहे. गोव्याची नवी पहाट पाहायची आहे. कोणीतरी विचारत होते, ''ममताजी गोव्यात काय करणार?'' का नाही? मी भारतीय आहे, मी कुठेही जाऊ शकते. तुम्ही कुठेही जाऊ शकता, असेही त्या म्हणाल्या. मी धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवते. माझा एकात्मतेवर विश्वास आहे. माझा विश्वास आहे की, भारत ही आपली मातृभूमी आहे. जर बंगाल माझी मातृभूमी आहे, तर गोवाही माझी मातृभूमी आहे."
गोव्यातील युवकांना आम्ही येणाऱ्या काळात नवनव्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे देखील ममता म्हणाल्या. खाणकामासाठी आम्ही धोरण तयार करणार आहोत. तसेच पर्यटनासाठी आम्ही नव्या संधीही उपलब्ध करून देणार आहोत. पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी काम करणार आहोत. आम्ही फक्त राजकारण करत नाही. निवडणूक आयोगाबद्दल बोलायला पुढीलवेळी गोव्यात येईन तेव्हा फुटबॉल घेऊन येईन, असे म्हणत ममता यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
भारतीय लोकशाही खूप मोठी आहे. माझा जरी जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला असला तरी गोवा माझे दुसरे घर आहे.
लिएंडर पेस, माजी टेनिसपटू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.