नवी दिल्ली - महागाईच्या मुद्द्यावर संसदेतील चर्चेनंतर काँग्रेस आणि मोदी सरकार यांच्यातील संघर्षाला आज राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर तोंड फुटले. महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसने आज देशव्यापी आंदोलन करून सरकारला घेरताना जोरदार शक्तिप्रदर्शनही केले.
स्वातंत्र्यादिनाच्या निमित्ताने सुरक्षाव्यवस्थेचे कारण देत दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू करून आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र ही बंदी झुगारून महागाईच्याविरोधात आंदोलन करण्याचे काँग्रेसने या आधीच जाहीर केले असल्याने पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. यामुळे मुख्यालय असलेल्या अकबर रोड परिसराला अक्षरशः पोलिस छावणीचे रुप आले होते. संसद आणि संसदेबाहेर सरकारच्या विरोधाचा ठळक संदेश जाण्यासाठी काळ्या पोषाखात सर्व खासदार संसदेत पोहोचले होते. पक्ष मुख्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांनाही किमान काळ्या फिती दंडावर बांधाव्यात अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राहुल गांधी काळ्या पोषाखात आले होते. राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे काळा फेटा, काळा कुर्ता आणि धोतर अशा वेशभूषेमध्ये सभागृहात आले होते. तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी काळ्या काठाची साडी परिधान करून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
प्रियांका गांधी- वद्रा पोलिसांच्या ताब्यात काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे वरिष्ठ नेते पोहोचले होते. सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांनी पक्षाच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. आंदोलनासाठी मुख्यालयात जमलेल्या नेते, कार्यकर्त्यांना बाहेर येऊ न देण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अडथळे उभारले होते. मात्र, या अडथळ्यांवर मात करत ते बाहेर पडले. पोलिसांनी अडविल्याने प्रियांका यांनी भर रस्त्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी प्रियांका यांची पोलिसांशी शाब्दिक चकमकही झाली. अखेर, पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या समवेत असलेल्या महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
विजय चौकामध्येच रोखले
संसदेत काँग्रेस खासदारांनी महागाईच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी करून दोन्ही सभागृहे दणाणून सोडली. यामुळे लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहे पीठासीन अधिकाऱ्यांना दुपारी बारापर्यंत तहकूब करावी लागली. त्यानंतर सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्व काँग्रेस खासदार राष्ट्रपती भवनावर मोर्चासाठी सरसावले. मात्र, पोलिसांनी त्यांना विजय चौकातच अडवून ताब्यात घेतले. पोलिसांनी काँग्रेस खासदारांना धक्काबुक्की केल्याचा तसेच त्यांना फरफटत नेल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
काँग्रेस खासदारांना आंदोलन करण्याच्या लोकशाही अधिकारापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. मागील तीन महिन्यांपासून काँग्रेस अध्यक्षांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ‘भारत जोडो’ यात्रेची घोषणा केली आहे. तेव्हापासून ‘धमकीजीवीं’नी काँग्रेस नेत्यांविरुद्ध सुडाचे राजकारण सुरू केले असून हा योगायोग नाही.
- जयराम रमेश, नेते काँग्रेस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.