MEC Card Mandatory : सशस्त्र दलात कार्यरत जवान आणि अधिकाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना (कुटुंबीय) लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी ‘मेडिकल एनटायटलमेन्ट कार्ड’ (एमईसी) अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतच्या सूचना संरक्षण मंत्रालयाच्या एकात्मिक मुख्यालयाद्वारे (सैन्यदल) देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ‘डिपेंडंट कार्ड’ लष्करी रुग्णालयात स्वीकारले जाणार नाहीत.
सशस्त्र दलात कार्यरत अधिकारी व जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना (पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी) विविध सेवांचा लाभ मिळावा यासाठी आजवर ‘डिपेंडंट कार्ड’ महत्वाचे मानले जात होते. हे डिपेंडंट कार्ड लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय सेवांसाठी देखील वापरले जात होते. परंतु आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या सूचनेनुसार १ फेब्रुवारी २०२४ पासून वैद्यकीय सेवांसाठी डिपेंडंट कार्डच्या वापरला बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे सर्व सैनिकी रुग्णालयात वैद्यकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी केवळ एमईसी कार्ड स्वीकारले जाणार आहेत. याबाबत लष्करी रुग्णालयांना देखील निर्देश देण्यात येणार आहेत. ‘एमईसी’ कार्डची वैधता तयार केल्याच्या तारखेपासून किंवा आदेश जारी केल्याच्या तारखेपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्यानुसार तीन वर्षांसाठी लागू असेल.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना एमईसी कार्डशिवाय तातडीने सेवा पुरवली जाईल. परंतु एमईसी शिवाय कोणताही लाभार्थी वारंवार रुग्णालयातून वैद्यकीय सेवा घेताना आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांद्वारे या लाभार्थ्यास उपचार नाकारण्याचा निर्णय घेता येईल. लष्करी रुग्णालयांमध्ये आधार बायोमेट्रिक टर्मिनल्स बसविण्यापर्यंत या अवलंबितांना वैद्यकीय सेवेसाठी एमईसी कार्डबरोबर आधार कार्ड देखील सादर करणे आवश्यक आहे. यासाठी डिजिलॉकरवर आधार कार्ड देखील स्वीकारले जाईल. ज्यामुळे सैन्यदल, नौदल, हवाई दल, तटरक्षक दलाबरोबर इतर लाभार्थ्यांना वैद्यकीय उपचार व सेवा घेताना कोणत्याही अडचण येणार नाही.
एमईसी कार्डसाठी सेवा कर्मचाऱ्यांद्वारे अर्ज करणे आवश्यक
अर्जाबरोबर ‘पार्ट २ ऑर्डर’ किंवा अवलंबित्वाचे सेवा कर्मचाऱ्याशी असलेले संबंध निश्चित करणारे ‘फील्ड सर्व्हिस’चे कागदपत्र जोडणे गरजेचे
प्राथमिक नोंदणी आणि एमईसी कार्ड जारी करताना आधार कार्डची ‘सेल्फ अटेस्टेड’ प्रतदेखील सादर करावी लागणार
कार्ड जरी करणाऱ्या विभागाद्वारे अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांची छाननी करेल व एमईसी कार्ड उपलब्ध केले जाईल
प्रत्येक अवलंबितांचे स्वतंत्र एमईसी कार्ड तयार केले जातील
सेवा कर्मचाऱ्यांनी कोणतीही खोटी माहिती सादर केल्यास आणि जारी करणाऱ्या प्रमाणीकरणाद्वारे अचूकता तपासण्यात अयशस्वी झाल्यास लष्करी कायदा १९५० च्या कलम ५७ नुसार कारवाई केली जाईल
त्यामुळे एमईसी कार्ड जरी करताना योग्य आणि अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.