पूंच/जम्मू : जम्मू आणि काश्मीरमध्ये पूंच जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर हल्ला करण्यासाठी चिलखत भेदू शकणाऱ्या पोलादी गोळ्यांचा वापर केल्याच माहिती अधिकृत सूत्रांनी आज दिली. त्याचप्रमाणे, जवानांची शस्त्रे पळवून नेणाऱ्या या दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले होते तर एक जवान जखमी झाला. नजीकच्या गावात इफ्तार पार्टीसाठी खाद्यपदार्थ नेणाऱ्या लष्कराच्या ट्रकला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.
एका दहशतवाद्याने समोरून ट्रकवर हल्ला केला. त्यानंतर इतर दहशतवाद्यांनी पोलादाचा वापर केलेल्या गोळ्या झाडल्या तसेच ट्रकवर ग्रेनेडही फेकले. ट्रकमध्ये राष्ट्रीय रायफल्समधील जवानांचा समावेश होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा गार्ड(एनएसजी) आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर, दहशतवाद्यांनी केलेल्या या प्राणघातक हल्ल्याचा उलगडा झाला.
पथकाच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी विरुद्ध दिशेने ट्रकवर गोळीबार करण्यास व ग्रेनेड फेकण्यास सुरूवात करण्यापूर्वी एका दहशतवाद्याने ट्रकवर समोरून हल्ला चढविला असण्याची शक्यता आहे. ट्रकमधील जवानांना प्रत्युत्तरासाठी वेळ मिळू नये, यासाठी दहशतवाद्यांनी ही रणनीती आखली असावी. त्याचप्रमाणे, दहशतवाद्यांनी चिलखत भेदू शकणाऱ्या पोलादी गोळ्यांचा वापर केला. हल्ल्यानंतर पळून जाताना त्यांनी ट्रकमधील जवानांची शस्त्रास्त्रे तसेच स्फोटकेही चोरून नेली.
दहशतवादी हल्ला झालेले ठिकाण दीर्घकाळापासून दहशतवादमुक्त समजले जात असले तरी येथील भाआ धुरियान जंगलाचा परिसर दहशतवाद्यांकडून भारतात घुसखोरीसाठी वापरला जातो. जंगल व नैसर्गिक गुहांमुळे प्रत्यक्ष ताबा रेषा (एलओसी) ओलांडून दहशतवादी घुसखोरी करतात. यापूर्वीही, २०२१ दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत नऊ जवान हुतात्मा झाले होते.
जम्मूत शोधमोहीम सुरू
लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराने पूंचमधील भाटा धुरियानमध्ये शोधमोहिम हाती घेतली आहे. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराने योग्य ती पावले उचलली आहेत, अशी माहिती लष्कराचे उत्तर विभागाचे कमांडर ले. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ट्विटद्वारे दिली. या ट्विटसोबत द्विवेदी यांनी दोन जवानांची छायाचित्रेही शेअर केली आहेत. द्विवेदी यांनी घटनास्थळाला भेट देत सीमेवरील सुरक्षेचा आढावाही घेतला. तसेच उधमपूरमधील रुग्णालयात जाऊन जखमी जवानाचीही विचारपूस केली. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत १६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.