Desh : समाजवादी पक्षाची नवी रणनीती

उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शहरी विभागातील निवडणुकांत भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सामना करण्यासाठी समाजवादी पक्षाने (सप) नवी रणनीती आखली आहे.
अखिलेश यादव
अखिलेश यादव Akhilesh Yadav
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शहरी विभागातील निवडणुकांत भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सामना करण्यासाठी समाजवादी पक्षाने (सप) नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार मुस्लिम-यादवांचे प्राबल्य असलेल्या पारंपरिक मतदारसंघांच्यापलिकडे जाऊन दलित आणि इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) मतपेढी लक्ष्य केली आहे.

या निवडणुकांसाठी चार आणि ११ मे रोजी मतदान होईल. निकाल १३ मे रोजी जाहीर केला जाईल. सपचे सर्वेसर्वा अखिलेश यादव हे आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर यांच्या साथीत नवी मतपेढी भक्कम करण्यासाठी रणनीती आखत आहेत. राज्याच्या पश्चिम भागातील दलितांवर त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. मागील काही काळापासून रणनितीची ही फेररचना सुरु आहे.

राज्यात जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सपने मोहीम राबविली. सत्ता मिळाल्यास तीन महिन्यांत जातीनिहाय जनगणना करू असे अखिलेश डिसेंबरमध्ये म्हणाले होते. सपच्या मागसर्गियांसाठीच्या शाखेचे राज्याचे प्रमुख राजपाल कश्यप म्हणाले की, जातीनिहाय जनगणनेची मागणी करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न केलेला आमचा एकमेव पक्ष आहे. आमची मोहीम बरीच यशस्वी झाली. आमच्या उमेदवारांना येत्या निवडणुकीत याचा बराच फायदा होईल.

या महिन्याच्या प्रारंभी त्यांनी दिवंगत दलित नेते कान्शीराम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. दलितांचे लक्ष वेधण्याचाच यामागील उद्देश होता.

अतिक-अश्रफ खूनाचा भाजपला फटका

सपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, गुंड अतिक अहमद व भाऊ अश्रफ यांच्या नुकत्याच झालेल्या खुनामुळे मुस्लिम मते भाजपच्या विरोधात जाऊ शकतात आणि याचा सपला फायदा होऊ शकतो. या दोघांना ज्या पद्धतीने मारण्यात आले ते संशय वाढविणारे आहे. ते मारले जातील अशी भीती होती, पण सरकारने काहीही केले नाही. आम्हाला धर्मावरून राजकारण करायचे नाही, पण उत्तर प्रदेशातील मुस्लिम सपची साथ कायम ठेवतील.

जनता ही एखाद्या पक्षाची आधीची कामगिरी बघत असते. राज्यात सप जेव्हा सत्तेवर होता तेव्हा त्यांनी दलित आणि ओबीसी वर्गांसाठी काहीही केले नाही. वास्तविक २०१२ ते २०१७ दरम्यान दलितांविरुद्ध सर्वाधिक अत्याचाराच्या घटना सपच्याच राजवटीत घडल्या. शहरी भागातील निवडणुकांत सप कधीच शर्यतीत नव्हता. राज्यातील जनतेने कामगिरी बघून भाजपलाच मत दिले आहे. सपच्या राजकीय नाटकबाजीमुळे जनता मूर्ख बनणार नाही.

- मनीष शुक्ला, भाजपचे प्रवक्ते

२०१७ मध्ये सपचे खाते रिकामे

सपचे खाते २०१७ मधील निवडणुकीत रिकामेच राहिले होते. महापौरपदाच्या १६ पैकी एकाही निवडणुकीत सपला यश आले नव्हते. १४ जागी भाजपची सरशी झाली, तर उर्वरित दोन जागा बसपला मिळाल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार १६ पैकी दहा ठिकाणी सपच्या, तर प्रत्येकी ११ ठिकाणी काँग्रेस आणि बसपच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

सपचे उमेदवार तुल्यबळ

राजकीय तज्ज्ञ सिद्धार्थ कल्हन्स यांच्यानुसार सपच्या २१३ पैकी केवळ १८ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली. यावेळी सपने लोकसंख्येच्या स्वरुपासह सर्व निकष लक्षात घेऊन तुल्यबळ उमेदवार उभे केले आहेत असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. ते म्हणाले की, दरवेळी जिंकणे हाच मुद्दा नसतो. मतांची टक्केवारी वाढविणे आणि २०२४ मधील महत्त्वपूर्ण सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी जनतेचा कल कोणत्या दिशेने आहे याची चाचपणी करणे हे सुद्धा सपचे उद्देश आहेत. या निवडणुकीत सपची कामगिरी चांगली झाली नाही तरी यातून मिळालेल्या धड्यांच्या जोरावर ते धोरणाचे फेररचना करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()