भुवनेश्वर - पुरी येथील भाजपचे उमेदवार संबीत पात्रा यांनी ‘भगवान जगन्नाथ देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त आहेत’ असे वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या मुद्यावरून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी भाजपवर आगपाखड केली.
‘भाजपने भगवान जगन्नाथाला राजकारणापासून दूर ठेवावे’ असे आवाहन पटनाईक यांनी केले. हा वाद अंगलट येत असल्याचे लक्षात येताच पात्रा यांना सारवासारव करताना अनावधानाने आपल्या तोंडून हे उद्गार बाहेर पडल्याचे नमूद केले. पंतप्रधान मोदी हे जगन्नाथाचे निस्सीम भक्त असल्याचे आपल्याला म्हणायचे होते असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पटनाईक यांनी या मुद्यावरून उडिया अस्मितेला हात घातला आहे. ‘महाप्रभू जगन्नाथ हे साऱ्या विश्वाचे दैवत आहेत. त्यांना दुसऱ्या माणसाचे भक्त ठरविणे हा त्यांचा अवमान आहे. पात्रा यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जगभरातील जगन्नाथ भक्त आणि उडिया भाषकांचा अवमान झाला आहे,’ असे पटनाईक यांनी नमूद केले.
या वादावर माध्यमांशी संवाद साधताना पात्रा म्हणाले की, ‘पुरीतील पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर मी अनेक माध्यमांशी संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी मी पंतप्रधान मोदी हे जगन्नाथाचे निस्सीम भक्त असल्याचे म्हटले आहे. केवळ एका बाईटमध्ये मी वेगळे विधान केले. त्यामुळे माध्यमांनी उगाच या गोष्टीचा बाऊ करू नये.’
भाजपच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. आता ही मंडळी आपण देवापेक्षाही मोठे आहोत असे मानू लागली आहेत. हा उद्धटपणाचा कळस झाला. देवालाच मोदींचा भक्त ठरविणे हा त्या देवतेचा अवमान आहे.
- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री
हा देश आणि ओडिशा राज भगवान जगन्नाथाचा अवमान कधीच सहन करणार नाही.
- अजोयकुमार, काँग्रेसचे प्रभारी
जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करू!
भुवनेश्वर - केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यास ‘एक देश, एक निवडणूक’, समान नागरी संहिता आदींची अंमलबजावणी करण्याचे संकेत देत भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासने आपले सरकार पूर्ण करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पंतप्रधानपदाच्या पुढील कार्यकाळाच्या सुरुवातीच्या १०० दिवसांच्या योजनेत देशातील तरुणांकडून सूचना मिळविण्यासाठी आणखी २५ दिवस वाढविले आहेत. तरुण पिढीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण येथे आहोत, अशी माहितीही पंतप्रधान मोदी यांनी पीटीआयला दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.