रायपुर- छत्तीसगडच्या बस्तर भागातील जंगलात अनेक सरकारी लोक जाण्यास घाबरतात. याठिकाणी सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये नेहमीच चकमक होत असते. अशा ठिकाणी धर्मपाल सैनी एक सेतू म्हणून काम करत आहे. ते अनेकदा सरकार आणि नक्षलवाद्यांमध्ये संवादाचा मार्ग मोकळा करुन देतात. त्यांच्याच प्रयत्नामुळे बीजापुरमध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या सीआरपीएफ कमांडो राकेश्नर सिंह यांची सुटका झाली. राकेश्नर सिंह यांच्या सुटकेमुळे 91 वर्षीय धर्मपाल सैनी चर्चेत आले आहेत. बस्तरचे ताऊजी किंवा बस्तरचे गांधी म्हणून ओळखले जाणारे सैनी यांना सरकारकडून पद्मश्रीचा सन्मान मिळाला आहे. 6 दशकांपासून आपले जीवन बस्तरसाठी समर्पित करणारे धर्मपाल सैनी यांचा आदिवासी आणि नक्षलवादी सन्मान करतात. ते कोण आहेत, हे आपण जाणून घेऊया.
धर्मपाल सैनी यांनी आपलं संपूर्ण जीवन बस्तरसाठी दिलंय
विनोबा भावे यांचे शिष्य राहिलेले धर्मपाल सैनी यांचा 1960 मध्ये बस्तरशी संबंध आला. त्यांनी येथील मुलींचे आयुष्य बदलण्याचा विडा उचलला. ते मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. सांगितलं जातं की, त्यांनी 60 च्या दशकामध्ये एका वृत्तपत्रात बस्तरमधील मुलींसंबंधी एक बातमी वाचली होती. बातमीनुसार, दसराच्या कार्यक्रमातून घरी परतणाऱ्या काही मुलींची काही मुलांनी छेड काढली होती. त्यावेळी या मुलींनी त्या मुलांचे हात-पाय कापून त्यांची हत्या केली होती. या प्रकारामुळे त्यांचे मन्न सुन्न झाले. या मुलींची उर्जा योग्य दिशेने नेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
विनोबा भावे यांनी दिली होती परवानगी
सैनी यांनी बस्तरमध्ये जाण्यासाठी विनोबा भावे यांची परवानगी मागितली होती. पण, विनोबांनी याला नकार दिला. पण, सैनी यांच्या हट्टामुळे त्यांनी परवानगी दिली, पण एक अट ठेवली की त्यांनी किमान 10 वर्ष तरी बस्तरमध्येच राहावं. 1976 मध्ये ते बस्तरमध्ये आले आणि इथलेच होऊन गेले. त्यांचे विद्यार्थी आणि स्थानिक लोक त्यांना ताऊजी म्हणून हाक मारतात. धर्मपाल सैनी यांनी आतापर्यंत 2 हजारपेक्षा अधिक खेळाडू तयार केले आहेत. सुरुवातीला ते जेव्हा बस्तरमध्ये आले, तेव्हा त्यांना कळालं की लहान-लहान मुलेही 15 ते 20 किलोमीटर सहज चालतात. या स्टॅमिनाचा उपयोग खेळ आणि शिक्षणात करुन घेण्यासाठी त्यांनी योजना आखली. 1985 मध्ये त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या विद्यार्थींनीना खेळांच्या स्पर्धांमध्ये उतरवलं.
सैनी यांच्याकडून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर
आदिवासी क्षेत्रामध्ये साक्षरता वाढवण्यासाठीचे सैनी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. याचमुळे त्यांना सरकारकडून पद्मश्री मिळाला आहे. सैनी यांच्या येण्याआधी बस्तरमध्ये साक्षरता 10 टक्क्यापेक्षा कमी होती. जानेवारी 2018 मध्ये ती वाढून 53 टक्के झाली आहे. त्यांच्या येण्याआधी आदिवासी मुली शालेत जायच्या नाहीत, पण आज अनेक मुली प्रशासकीय सेवेने मोठ्या पदावर आहेत. त्यांच्या याच योगदानासाठी त्यांना 1992 मध्ये पद्मश्री सन्मान मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.