भारतात कोरोना व्हायरसच्या (कोविड १९) प्रसाराला सुरुवात झाल्याने अनेकांना ब्रिटिशांच्या काळात मुंबई, पुणे प्रांतात आलेल्या प्लेगच्या साथीची आठवण झाली. त्या पूर्वीही अनेक वेळा साथीच्या रोगांनी डोके वर काढले होते. अनेक तज्ज्ञ मंडळींच्या मते स्वच्छतेचा अभाव, सार्वजनिक आरोग्याची हेळसांड, कुपोषण अशा कारणांमुळे साथ फैलावण्यास वेळ लागत नाही. कोरोना व्हायरस हा नवीन आजार असला तरी भारतात १९ ते २१ व्या शतकात पटकी (कॉलरा), शीतज्वर (एन्फ्ल्युएन्झा), डेंगी, देवी अशा अनेक आजारांची साथ याआधी आलेली आहे.
एकोणिसावे शतक...
कॉलराच्या साथी
- १८१७ : ब्रिटिशांच्या अमलाखालील भारतात प्रथमच कॉलराची साथ आली, असे मानले जाते. ही सर्वांत भयावह साथ होती. याचा पहिला रुग्ण २३ ऑगस्ट १८१७ रोजी आढळला. या साथीतील मृतांची नोंद झाली नसल्याने ती संख्या समजू शकत नाही. पुढे १८२९ बारा वर्षांनी पुन्हा भारताला दुसऱ्यांदा कॉलराच्या साथीने ग्रासले.
-१८५२ : जगात तिसऱ्यांदा कॉलराची साथ पसरली. १८५२ ते १८६० अशा प्रदीर्घ काळ ती कायम होती. ज्या देशांना आत्तापर्यंत कधीही फटका बसला नव्हता त्या देशांत तिचा प्रसार आला हे विशेष होते. पर्शिया, अरेबिया आणि तेव्हाच्या रशियात या साथीचा जोर कायम होता.
- १८६३ : या साथीचा प्रादुर्भाव १८६३ पासून झाला, मात्र १८६५ मध्ये तिचा फैलाव सर्वाधिक होता. जगभरातील यात्रा-जत्रांमुळे याचा संसर्ग वाढल्याचे सांगण्यात येते. भारतात साथीचा सर्वाधिक फटका १८७७ मध्ये मद्रास प्रेसिडेन्सिला बसला. त्या वेळी कॉलराच्या साथीचा मृत्यू दर वार्षिक १० टक्के होता. यानंतर १८८१ मध्येही पाचव्यांदा कॉलराची साथ आली, पण आधीच्या चार साथींपेक्षा मृत्यूचे प्रमाण कमी होते.
मुंबई प्लेग (१८९६)
वसाहतवादी काळात मुंबईत प्लेगची साथ सप्टेंबर १८९६ मध्ये आली. यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. या साथीत हजारो जणांचा बळी गेला, तर अनेकांना शहर सोडावे लागले. यानंतरच्या काळात मुंबईत व्यापारवृद्धी झाल्याने तेथील लोकसंख्याही झपाट्याने वाढू लागली.
विसावे शतक...
एन्फ्ल्युएन्झा (१९१८)
याला १९१८-१९ मधील स्पॅनिश फ्लू असेही म्हणतात. एन्फ्ल्युएन्झाच्या साथीने जगभरात हाहाःकार माजवला. यात जभरातील मृतांचा आकडा २ ते ५ कोटी एवढा मोठा होता. या आजार एन्फ्ल्युएन्झा विषाणूच्या ‘एच१एन१’ प्रकारामुळे झाल्याचे सांगण्यात येते. भारतात १९७०-१९९० या काळात पोलिओची साथ आली. देशातील शहरी व ग्रामीण भागात आणि उत्तर प्रदेशात पोलिओग्रस्तांचे प्रमाण सर्वाधिक होते. विसाव्या शतकात १९७४ मध्ये देवीच्या साथीने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. भारतात ८५ टक्के लागण झाली होती. पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा या राज्यांमधील गावांत याचा प्रभाव मोठा होता. यातील मृतांची संख्या १५ हजार होती. ज्यांना लागण होऊनही बचावले त्यांना अंधत्व व अन्य व्यंग आले.
एकविसावे शतक...
उत्तर भारतातील प्लेग (२००२)
उत्तर भारतात ही साथ आली. हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यात याचा प्रभाव जास्त असला तरी ती लवकर आटोक्यात आली.
डेंगी (२००३)
सप्टेंबर २००३ मध्ये ही साथ आली. सुरुवातीला दिल्लीत तिचा प्रभाव होता. नंतर ती अन्यत्र पसरली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये डेंगीचा प्रसार मोठा होता. यातील मृत्यूदर हा तीन टक्के होता. मात्र अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजूनही याचे गांभीर्य मोठे होते.
सार्स (२००३)
सार्स (सिव्हर ॲक्युट रेस्पिटरी सिंड्रोम) हा एकविसाव्या शतकात उद्भवलेला पहिला संसर्गजन्य गंभीर आजार आहे. चीनमधील गुआंगडाँग प्रांतात याचा उगम २००३ मध्ये झाला. त्यानंतर आशिया, अमेरिका आणि युरोप खंडातील ३० देशांमध्ये तो वेगाने पसरला. सात ते आठ महिन्यांत एकूण ८ हजार ४३९ जणांना याची लागण झाली व ८१२ जणांचा मृत्यू झाला.
चिकूनगुनिया (२००६)
अहमदाबादमध्ये २००६ मध्ये ३४ लाख लोकांना चिकूनगुनिया झाला. तेथे २ हजार ९४४ रुग्णांचा मृत्यू झाला. भारतात २००६ ते २०१८ या काळात विविध भागांत डेंगी, चिकूनगुनिया, मेनिंगगोकोकल मेनिंजायटिस, कावीळ, ‘एच१एन१’, भारतीय स्वाइन फ्लू अशा आजरांची साथ आलेली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.