शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) मुंबईत अटक केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांत नव्या आठवड्याचीही सुरवात आज प्रचंड गोंधळाने झाली.
नवी दिल्ली - शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) मुंबईत अटक केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांत नव्या आठवड्याचीही सुरवात आज प्रचंड गोंधळाने झाली. राज्यसभेत शिवसेनेच्या अनिल देसाई यांच्या एकाकी लढ्याला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेसची साथ मिळाली. देसाईंना तंबी देताना राज्यसभा अध्यक्ष वेंकैय्या नायडू यांनी त्या प्रकरणाचा (राऊत यांना अटक) सभागृहाशी काही संबंध नाही. ते इथे काढू नका. बाहेरचे स्कोर सेटल करण्यासाठी या सदनाचा वापर करू नका, अशी तंबी दिली.
महागाईवर राज्यसभेत उद्या (ता. १७६) चर्चा होणार आहे. मात्र राऊत यांना अटक, आसामचे मुखअयमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांचे मनी लॉन्डरिंगचे प्रकरण यावरून विरोधक संतप्त आहेत. नरेंद्र मोदी सरकार विरोधकांवर सूडबुध्दीने कारवाई करत असल्याचा आरोप करून विरोधकांनी आज पुन्हा संसद दणआणून सोडली. अनिल देसाई यांनी आज सुरवातीपासूनच रूद्रावतार धारण केला होता. नायडू यांनी त्यांना चार वेळा तंबी दिली. तुमचे बाहेरचे वाद व सदन यांचा काही संबंध नाही. बाहेरची प्रकरणे येथे आणू नका हे नायडू यांचे सांगणे विरोधकांनी जुमानले नाही. त्यामुळे सकाळी ११ ला सुरू झालेले कामकाज अवघ्या २ मिनीटांत गुंडाळण्यात आले. नंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने दुपारी दोनपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. या दरम्यान गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास काही काळ चालविण्यात आला. कधीही वेलमध्ये न येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही आज वेलमध्ये उतरले होते.
दरम्यान खर्गे यांनी सकाळ ला सांगितले की त्यांना (भाजप) विरोधकमुक्त संसद हवी आहे. त्यसाठीच जे जे बोलतात त्या विरोधी पक्षनेत्यांविरूध्दची प्रकरणे बाहेर काढून त्यांना त्रास दिला जात आहे. संजय राऊत कायदेशीर लढाई लढतील. एखादा प्रॉपर्टीचा मुद्दा असेल तर त्यासाठी कायदा आहे. पण राऊत यांची ईडीकडून ६ तास चौकशी करण्यात आली. व नंतर त्यांना अटक केली. हा निव्वळ विरोधकांचा छळ सुरू आहे.
शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी, राऊत यांच्या अटकेविरोधात संसदेत आवाज उठविणे आम्ही चालू ठेवू असे सांगितले. भाजप संसदेत व संसदेबाहेर विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विरोधक झुकणार नाहीत व या दबावतंत्राला बळीही पडणार नाहीत. राज्यसभेच्या एका ज्येष्ठ खासदारांवरील अटकेच्या या अन्याय्य कारवाईच्या विरोधात आपण नायडू यांना हस्तक्षेपाची विनंती करू व त्यासाठी पत्र लिहून दाद मागू असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे स्किप्ट वाचून दाखवतात, राज्यपाल दिवसरात्र काहीही बरळत असतात आणि भाजपविरोधात बोलणाऱयांचा आवाज त्यांना तुरूंगात टाकून बंद केला जात असल्याची टीका चतुर्वेदी यांनी केली.
रमेश विरूध्द रमेश !
राज्यसभेत दुपारी साडेबाराच्या सुमारास कामकाज तहकूब झाले तोच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सध्या भाजपमध्ये असलेले आंध्र प्रदेशातील सी एम रमेश यांच्या कथित अवैध संपत्तीच्या प्रकरणाचा उल्लेख केला. जयराम रमेश यांनी आपला नामोल्लेख करताच भाजपचे रमेश इतके भडकले की ते धावतच जयराम यांच्या आसनाजवळ गेले. तेथे दोघांत प्रचंड वाद झाला. जयराम रमेश यांनी, तुम्ही माझ्याशी बोलू नका, असे बजावताच रमेश आणखी चिडले. शेवटी काही काँग्रेस खासदारांनी मध्यस्ती करून दोघांना दूर केले. भाजप बाकांकडे जाता जाता सी एम रमेश यांनी पत्रकार कक्षाकडे पाहून, यांचे (जयराम रमेश) डोके फिरले आहे असे हावभाव केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.