दर्दपोरामध्ये शाळेचे स्वप्न पूर्ण!

सकाळ रिलिफ फंड व ‘सरहद’चा सहभाग, नव्या इमारतीचे उद्‍घाटन
 Sarhad school
Sarhad schoolsakal
Updated on

श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यातील अत्यंत दुर्गम व गेली काही दशके कायम अस्वस्थता अनुभवलेल्या दर्दपोरामध्ये शाळेचे स्वप्न पूर्ण झाले. ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या साह्याने व सरहद संस्थेच्या पुढाकाराने हे स्वप्न प्रत्यक्षात आले. काश्‍मीरचे विभागीय आयुक्त पी. के. पोळे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे उद्‍घाटन झाले.

‘‘काश्‍मीर खोऱ्यातील उपेक्षित मुला-मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी पुण्यातील सरहद संस्था व सकाळ रिलिफ फंड कौतुकास पात्र आहेत,’’ असे प्रतिपादन पी. के. पोळे यांनी केले.

‘‘जम्मू-काश्‍मीरमधील शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी सामाजिक संस्थांनी सरकारला मदत करण्यासाठी पुढे यायला हवे. यासाठी त्यांनी ‘सरहद’ व ‘सकाळ’चा आदर्श घ्यावा,’’ अशी अपेक्षाही पोळे यांनी व्यक्त केली. ‘‘शिक्षण क्षेत्रात सकाळ काही वर्षांपासून काम करत आहे. काश्‍मीर आणि महाराष्ट्र जोडण्याच्या हेतूने दर्दपोरा येथे शाळेची इमारत सकाळ रिलिफ फंडाच्या साह्याने उभारण्यात आली आहे,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ’चे संचालक संपादक श्रीराम पवार यांनी केले. दर्दपोरामधील शाळेत फातिमा शेख यांच्या नावाने ग्रंथालयही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

कुपवाडाचे उपायुक्त इमाम दिन, उद्योग आणि व्यापार खात्याचे संचालक मेहमूद अहमद शहा, ‘सकाळ’चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर महेंद्र पिसाळ, सकाळ रिलिफ फंडाचे विश्‍वस्त डॉ. सतीश देसाई, ॲड. शिवराज कदम, ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, शैलेश पगारिया, युवराज शहा, नीलेश नवलखा, इम्रान शेख, तसेच कुपवाडाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बशीर अहमद, पोलिस व प्रशासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मागास भागात मुलांना शिक्षणासाठीच्या पायाभूत सुविधा मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. येथे राहणाऱ्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची विनंती नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना केली. त्यावर त्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही पोळे यांनी दिली.

दुर्गम दर्दपोरा

दर्दपोरा हे कुपवाडा जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील गाव. दहशतवादी कारवाया वाढल्यानंतर १९९०पासून या गावाने अस्वस्थता अनुभवली आहे. गावातील सुमारे ४०० कर्ते पुरुष दहशतवाद्यांच्या गोळीबारात किंवा सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारात मारले गेले आहेत. त्यांच्या विधवा आणि मुले गावात राहतात. अत्यंत मागास असा हा भाग आहे. तसेच पाण्याचाही येथे तुटवडा आहे. शिक्षणाच्या मूलभूत सेवेपासून हे गाव अनेक वर्षे वंचित होते. तेथे आता शाळा सुरू झाली आहे.photo

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.