नवी दिल्ली - शेतमालाच्या किमान हमी भावाला कायद्याची गॅरंटी द्यावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला पंजाब-हरियानाच्या शंभू सीमेवर मंगळवारी हिंसक वळण लागले.
दिल्लीत शिरकाव करण्याचा चंग बांधलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तर आंदोलकांनी दगडफेक व जाळपोळ केली, असंख्य बॅरिकेड तोडून टाकले. यावेळी झटापटीत जखमी झालेल्या जवानांना अंबाला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतकरी बुधवारी पुन्हा दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत.
शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करू नये व आंदोलन मागे घ्यावे यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अर्जुन मुंडा यांनी त्यांची भेट घेतली होती. सुमारे चार तास चर्चा झाली होती. काही मुद्द्यांवर सहमतीही झाली होती. मात्र प्रमुख मुद्द्यांबाबत तोडगा न निघाल्याने आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. आंदोलन शेतकऱ्यांनी आज सकाळी दिल्लीच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली.
शंभू सीमेवर पोहोचलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिस व शीघ्र कृती दलाच्या जवानांना बळाचा वापर करावा लागला. ‘ड्रोन’च्या माध्यमातून अश्रुधुराचा मारा करण्यात आला. तसेच, पाण्याचे फवारे पोलिसांना सोडावे लागले. यानंतरही जमाव शांत झाला नाही. पोलिसांनी असंख्य आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेशातून दिल्लीत येणाऱ्या प्रमुख सीमांवर बॅरिकेड, काटेरी कुंपण, मोठे लोखंडी खिळे लावण्यात आले होते. शिवाय मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मुख्य मार्ग बंद करण्यात आल्याने दिल्लीच्या सीमांवर आणि शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. याचा जबर फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.
आंदोलक ‘रेशन’सह
गेल्यावेळच्या आंदोलनाचा अनुभव लक्षात घेऊन सिंघू, गाझीपूर, शंभू, झरोडा आणि टिकरी सीमेवर काटेरी कुंपण, मोठाले लोखंडी खिळे आणि सिमेंट काँक्रिटचे बॅरिकेड लावण्यात आले होते. तर चिल्ला सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनस्थळावर ‘ड्रोन’च्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती.
पंजाब, हरियानातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरसहित दिल्लीच्या सीमेवर धडक मारली. आंदोलन दीर्घकाळ चालू ठेवण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी रेशन सोबत आणल्याचे दिसत होते.
यापूर्वी शेतकऱ्यांनी २६ नोव्हेंबर २०२० रोजी आंदोलनाला सुरुवात केली होती. साधारण वर्षभर हे आंदोलन चालले होते. नव्याने करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर ते थांबविण्यात आले होते.
अश्रुधुराचा वापर
पंजाब-हरियाना दरम्यानच्या शंभू सीमेवर पोलिस आणि शेतकऱ्यांदरम्यान मोठी झटापट झाली. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी ‘ड्रोन’च्या माध्यमातून अश्रुधुराचा मारा केला. याला उत्तर म्हणून आंदोलकांकडून जाळपोळ व दगडफेक करण्यात आली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सीमेवर जणू युद्ध आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. पूर्व दिल्लीला जोडणाऱ्या ‘आयटीओ’ चौकात ‘क्रेन’च्या माध्यमातून मोठे कंटेनर आणून रस्ता अडविण्यात आला होता.
प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे
जागतिक व्यापार संघटनेतून भारताने माघार घ्यावी
गेल्या आंदोलनात सामील असलेल्यांवरील गुन्हे रद्द करावेत
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अमलात आणाव्यात
हमी भावाला कायद्याचे कवच द्यावे
२०१३ चा जमीन अधिग्रहण कायदा पूर्ववत करावा
लखीमपूर खेरी घटनेतील दोषींना शिक्षा करावी व मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी
शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन द्यावे
किमान आधारभूत किमतीबाबतचा कायदा घाईघाईने आणि कोणत्याही चर्चेविना अजिबात आणला जाणार नाही. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारशी मुद्देसूद चर्चा करावी. तसेच, आंदोलनाचा राजकीय वापर करून घेणाऱ्या घटकांना दूर ठेवावे.
- अर्जुन मुंडा, केंद्रीय कृषी मंत्री
पंजाब आणि हरियानाच्या सीमेवरच प्रचंड अडथळे उभारून शेतकऱ्यांना अडविले जात आहे. राज्यांच्या या सीमांना आंतरराष्ट्रीय सीमांचे स्वरूप आणले गेले आहे. हरियाना सरकार शेतकऱ्यांचे अत्याचार करत आहे.
- सरवानसिंग पंधेर, सरचिटणीस, किसान मजदूर संघर्ष समिती
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा वापर ही लाजिरवाणी बाब आहे. अन्नदात्यांवर भाजपने केलेला हा क्रूर हल्ला आहे.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
अन्नदात्याला तुरुंगात टाकणे अत्यंत चुकीचे आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
आंदोलनात सामील होण्यासाठी आम्हीही तयार आहोत. शेतकऱ्यांवर लाठीमार होऊ दे अथवा अश्रुधुराचा मारा होऊ दे, ते मागे हटणार नाहीत. आम्ही सर्व शेतकरी एक आहोत.
- राकेश टिकैत, शेतकरी नेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.