नवी दिल्ली - देशातच नाही तर जगभरात सलग नऊ दिवस बेजार करणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा सुमारे ५ अब्ज नागरिकांना फटका बसला असून यात भारतातील ६१ कोटी ९० लाख लोकांचा समावेश आहे. अमेरिकेतील एका शास्त्रज्ञांच्या स्वतंत्र गटाने केलेल्या अभ्यासातून हवामान बदलामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता वाढली असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.
क्लायमेंट सेंट्रलच्या शास्त्रज्ञांनी जगातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना जून मध्यातील उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे. हवामान बदलामुळे आलेली उष्णतेची लाट ही अंदाजापेक्षा तीन पटीने अधिक तीव्र होती. जंगलतोड, तेल, गॅस आणि कोळसा यासारख्या इंधनाचा वापर वाढल्याने जगभरात उष्णतेची लाट आल्याचे अहवालात म्हटले आहे.
१६ ते २४ जून दरम्यान सुमारे ४ अब्ज ९७ कोटी लोकांनी उष्णतेच्या सर्वाधिक झळा सहन केल्या आणि या झळा अंदाजापेक्षा दोन ते तीन पट अधिक तीव्रतेच्या होत्या. अलिकडेच जगभरातील बहुतांश भागात कमाल तापमानात विक्रमी वाढ नोंदली गेली आहे. जगातील अनेक भागातील उच्चांकी कमाल तापमान अनेकांसाठी जीवघेणे ठरले.
सौदी अरबमध्ये हज यात्रेदरम्यान १३०० जणांचा मृत्यू उष्माघाताने किंवा त्यासंबंधी आजाराने झाला आहे. स्थानिक पातळीवर ५० अंशांवर कमाल तापमान पोचले होते. मक्का येथे १८ मे पासून हवामान बदलामुळे कमाल तापमानाची शक्यता तीन पटीने वाढली आणि ती २४ मे पासून पाच पटीने वाढली.
युरोपीय युनियन पुरस्कृत क्लायमामीटरच्या शास्त्रज्ञांनी सौदी अरबमध्ये यंदा तापमान सरासरीपेक्षा अडीच अंश अधिक नोंदले गेल्याचे म्हटले आहे. ग्रीसमध्ये ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान राहिले आणि त्यामुळे अथेन्समधील ऐतिहासिक वास्तू एक्रोपोलिस पर्यटकांसाठी बंद करावे लागले. तरीही अती उन्हामुळे सहा पर्यटकांचा मृत्यू झाला.
अमेरिका आणि आशियात उष्णतेची लाट
अमेरिकेला सलग दोनदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. तर मेक्सिकोत भीषण उष्णतेमुळे १२५ जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात तापमान वाढले आणि त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये उष्णतेसंबंधी आपत्कालिन सेवेच्या मागणीत ५०० ते ६०० टक्के वाढ झाली. भारताचा विचार केल्यास यावेळी भारतीय नागरिक उष्णतेने बराच काळ घामाघुम राहिले. काही भागात ५० अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली.
चीन, इजिप्तमध्ये नागरिकांचे बेहाल
चीनमध्ये देखील ५० अंश तापमानाची नोंद झाली. वुहान येथे वातानुकूलित यंत्रणेची वाढती मागणी पाहता लोडशेडिंग सुरू करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अन्य देशांत देखील उच्चांकी तापमान नोंदले गेले. पॅराग्वे, पेरू येथे जून महिन्यांत सर्वाधिक उष्ण दिवस नोंदले गेले. इजिप्तमध्ये कमाल तापमान ५० अंशांच्या आसपास राहिले. इजिप्तमध्ये वीज प्रकल्पावरील ताण कमी करण्यासाठी वीज कपात सुरू केली गेली आहे.
जीवाश्म इंधनाचा वाढता वापर आणि जंगलतोडीमुळे उष्णतेची लाट येते आणि अशा कारणांमुळे लाट येण्याची शक्यता पाच पटीने अधिक राहते. तसेच ही लाट पूर्वीच्या तुलनेत दीड अंश सेल्सिअसपेक्षा अधिक उष्ण राहते. जीवाश्म इंधनाचा वापर कमी न केल्यास शतकातून दोनदा येणारी उष्णतेची तीव्र लाट ही आगामी काळात दर तीन वर्षाला येऊ शकेल, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
उष्णतेच्या लाटेचा नागरिकांना फटका
भारत...............६१ कोटी ९० लाख
चीन..............५७ कोटी ९० लाख
इंडोनेशिया...............२३ कोटी १० लाख
नायजेरिया...............२० कोटी ६० लाख
ब्राझील...............१७ कोटी ६० लाख
बांगलादेश..............१७ कोटी १० लाख
अमेरिका...............१६ कोटी ५० लाख
युरोपीय देश...............१५ कोटी २० लाख
मेक्सिको.................१२ कोटी ३० लाख
इथोपिया.................१२ कोटी १० लाख
इजिप्त.................१० कोटी ३० लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.