Himanta Biswa : आसाममधील पूरस्थिती भौगोलिक कारणांमुळे;आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचे प्रतिपादन, परिस्थितीचा आढावा

आसाममधील पूरस्थितीला भौगोलिक आणि नैसर्गिक घटक कारणीभूत असून यावर नियंत्रण मिळविणे हे राज्य सरकारच्या हातात नाही, असा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी बुधवारी केला.
Himanta Biswa
Himanta Biswasakal
Updated on

गुवाहाटी : आसाममधील पूरस्थितीला भौगोलिक आणि नैसर्गिक घटक कारणीभूत असून यावर नियंत्रण मिळविणे हे राज्य सरकारच्या हातात नाही, असा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी बुधवारी केला. शेजारील अरुणाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे राज्यात पूरस्थिती आल्याचे सरमा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कामरूप जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चीन, भूतान आणि अरुणाचल प्रदेशातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटीमुळे आसाममध्ये पूर येत असून हे प्रशासनाच्या नियंत्रणापलीकडे आहे. असे असले तरी मागील काही वर्षांत सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत असून, लोकांचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जात आहे. जे तुमच्या नियंत्रणात नाही त्याच्याशी तुम्ही फक्त अधिक चांगल्यापद्धतीने सामना करू शकता, असे सरमा म्हणाले.

पूरस्थितीचा आढावा

सरमा यांनी खनंजन नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्याचप्रमाणे येथील तात्पुरत्या निवारा केंद्रात जाऊन विस्थापित नागरिकांची भेट घेऊन त्यांना पुरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्याचप्रमाणे येथील नागरिकांना अन्न आणि औषधे वेळेवर उपलब्ध करून देण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. आसाममधील माजुली या गावात बंधारा फुटल्याने सखल भाग पाण्यात गेला होता, या ठिकाणीही गुरुवारी भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सरमा यांनी सांगितले.

अरुणाचलमध्ये पूरपरिस्थिती कायम

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील पूरपरिस्थिती बुधवारीही तशीच असून राज्यातील सर्व नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. राज्यातील नामसाई, लोहित, चांगलांग आणि पश्‍चिम सिंयांग जिल्‍ह्यांतील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे, तर इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. राज्यातील पूरपरिस्थितीचा सुमारे ६१ हजार ९४८ जणांना फटका बसला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील १४३.५८ हेक्टर शेत जमिनी आणि बागायती जमिनींचेही पुरामुळे नुकसान झाले आहे. दुसरीकडे इटानगर शहरातील जलवाहिन्यांचे भूस्खलनामुळे नुकसान झाले असून, येथील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.

मणिपूरमध्येही संततधार

इंफाळ ; मणिपूरमध्येही सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंफाळ पश्‍चिम आणि इंफाळ पूर्व येथील दोन मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर सरकारने सर्व सरकारी कार्यालयांना बुधवारी सुटी जाहीर केली असून, सर्व शाळांना बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवस सुटी देण्यात आली आहे. इंफाळ नदी प्रमाणेच कोंगबा, इरिल या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. भारत म्यानमार मार्गावर मोठ्याप्रमाणात पुराचे पाणी आल्याने सुमारे एक हजार नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. येथे बचावकार्य सुरू असून येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.