Bihar Flood Update : बिहारला पुराचा धोका कायम; वाल्मिकीनगर, बीरपूर बंधाऱ्यातून विक्रमी विसर्ग

नेपाळमधील अतिवृष्टीने बिहारमध्ये निर्माण झालेला पुराचा धोका अद्याप कायम आहे. बीरपूर आणि वाल्मिकीनगर बंधाऱ्यातून गेल्या ५६ वर्षांतील विक्रमी विसर्गाने राज्याच्या उत्तर, दक्षिण आणि मध्य भागांत राज्य सरकारने पुराचा इशारा दिला आहे.
Bihar Flood Update
Bihar Flood Updatesakal
Updated on

पाटणा : नेपाळमधील अतिवृष्टीने बिहारमध्ये निर्माण झालेला पुराचा धोका अद्याप कायम आहे. बीरपूर आणि वाल्मिकीनगर बंधाऱ्यातून गेल्या ५६ वर्षांतील विक्रमी विसर्गाने राज्याच्या उत्तर, दक्षिण आणि मध्य भागांत राज्य सरकारने पुराचा इशारा दिला आहे. सीतामढी जिल्ह्यातील सीतामढी जिल्ह्यातील मधकौल गावातील बागमती नदीचा बंधारा फुटला असून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.

या घटनेत जीवितहानी झाली नसून गावकऱ्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे, अशी माहिती सीतामढीचे जिल्हा दंडाधिकारी ऋषी पांडे यांनी दिली. बीरपूर बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडल्याने गोपाळपूर जवळील कोसी पूर्व बंधाऱ्यातूनही गळती सुरू झाली. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे.

कोसी नदीवर असलेल्या बीरपूर बंधाऱ्यातून आज पहाटे पाच वाजेपर्यंत सुमारे ६.६१ लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. हा गेल्या ५६ वर्षांतील सर्वांत मोठा विसर्ग आहे. यापूर्वी या बंधाऱ्यातून १९६८ मध्ये ७.८८ लाख क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला होता. बीरपूर बंधाऱ्यातील मोठ्या विसगामुळे बिहारमधील १३ जिल्ह्यांतील १६.२८ लाख लोकांची अवस्था आणखी बिकट होऊ शकते. हे लोक आधीपासूनच पुराचा सामना करत आहेत.

बीरपूरप्रमाणे गंडक नदीवरील वाल्मिकीनगर बंधाऱ्यातूनही मोठा विसर्ग सुरू आहे. शनिवारी (ता.२८) रात्री या बंधाऱ्यातून ५.६२ लाख क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येत होता. २००३ मधील ६.३९ लाख क्युसेक विसर्गानंतरचा हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बंधाऱ्याजवळील वाहतूक थांबविण्यात आली आहे.

बिहारचे जलसंपदा मंत्री विजयकुमार चौधरी म्हणाले, की गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंडक, कोसी, बागमती आणि गंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, नेपाळमधील अतिवृष्टीमुळेही सीमेवरील जिल्ह्यांतील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

बंगालमधील पुराकडे केंद्राचे दुर्लक्ष

उत्तर बंगालमधील पूरस्थिती धोकादायक होत असून केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्या बॅनर्जी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, की राज्य सरकार युद्ध पातळीवर पुराचा सामना करत आहे. उत्तर बंगालमधील कुचबिहार, जलपायगुडी आदी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून केंद्र सरकार राज्यांना नैसर्गिक आपत्तीत मदत करण्याची भूमिका निभावत नाही.

जलसंपदा विभागाची पथके बिहारमधील धरणे, बंधाऱ्यांवर २४ तास लक्ष ठेवून आहे. त्यामुळे, कोणताही धोका निदर्शनास आल्यानंतर तत्काळ पावले उचलली जातील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

- विजयकुमार चौधरी, जलसंपदा मंत्री, बिहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.