गुवाहाटी : गेले काही दिवस पुराचा सामना करणाऱ्या आसामला दिलासा मिळाला आहे. राज्यातील पूरस्थितीत सुधारणा झाली असून प्रमुख नद्यांचे पाणी ओसरू लागले आहे. पूरग्रस्तांची संख्याही २२ लाखांपर्यंत घटली आहे. मात्र, कच्चर जिल्ह्यातील सिल्चर शहरातील पूरस्थिती गंभीरच असून अद्याप अनेक भाग पाण्याखाली आहेत. रविवारी (ता.२६) पुराशी संबंधित घटनांमुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. इतर दोघे बेपत्ता झाले. त्यामुळे, एकूण मृतांची संख्या १२६ वर पोचली आहे.
राज्यात पूरग्रस्तांची संख्या घटत आहे. शनिवारी (ता. २५) ती २५ लाख होती. रविवारी मात्र ती २२.२१ लाखांपर्यंत कमी झाली, अशी माहिती आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली. कोपिली, बराक आणि कुशियारा या नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. गेल्या आठवडाभरापासून पाण्यात असलेल्या सिल्चरमधील अद्याप प्रशासन पोचू न शकणाऱ्या भागात हवाई दलांच्या हेलिकॉप्टरमार्फत खाद्यपदार्थांची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या व इतर साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोचविले जात आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी दोन दिवसांनंतर रविवारी पुन्हा सिल्चरचा दौरा करून पूरस्थितीचा तसेच मदतकार्याचा आढावा घेतला.
मणिपूरची आसामला मदत
पूरग्रस्त आसामला मणिपूरने मदतीचा हात दिला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बीरेनसिंह यांनी राजधानी इंफाळमधून मदतसाहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांना हिरवा झेंडा दाखविला. या साहित्यामध्ये तांदूळ, दाळ, मीठ, तेलाचा समावेश असून ते अंदाजे एक कोटी रुपयांचे आहे. त्याचप्रमाणे, एसडीआरएफचे ४० जवानही मणिपूरने रवाना केले आहेत.
सिल्चरमधील पूर मनुष्यनिर्मित
बेतकुंडी येथील बंधारा समाजकंटकांनी फोडल्याने सिल्चरमध्ये मोठा पूर आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे, हा पूर मनुष्यनिर्मित असल्याचा आरोपही केला जात आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. राज्य सरकारने राजधानी गुवाहाटी व जोरहाटवरून खाद्यपदार्थांची ३,५७५ पाकिटे पाठविली.
रस्त्यावर केमोथेरपी
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या काचर येथे पाऊस थांबताच कॅन्सर रुग्णालयातील कर्मचारी रस्त्यावर रुग्णांना केमोथेरपीचे उपचार देत आहेत. रुग्णालय सुरु राहावे म्हणून जीवरक्षक जॅकेट तसेच रबराचा तराफा पुरविण्यात यावा अशी विनंती प्रशासनाला करम्यात आली आहे. या रुग्णालयाची क्षमता दिडशे खाटांची आहे. समन्वयक आर. धार्शना यांनी सांगितले की, प्राथमिक निदानाचे कामही रस्त्यावर केले जात आहे. भूल देण्यासाठी नायट्रस गॅसचाही तुटवडा भासत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.