नवी दिल्ली -भारताचे महान धावपटू आणि फ्लाइंग शिख अशी ओळख असणारे मिल्खा सिंग यांचे निधन झाले. 'काळजी करू नका, मला आश्चर्य वाटतं की मला संसर्ग कसा झाला? मी लवकरच बरा होईन अशी आशा आहे.' मिल्खा सिंग यांनी रुग्णालयात दाखल होण्याआधी PTI वृत्तसंस्थेशी बोलताना आशावाद व्यक्त केला होता. कोरोनावर मात करून मिल्खा सिंग जिंकले, पण त्यांची आयुष्याची ही जीवनमरणासोबतची अखेरची शर्यतसुद्धा रोम ऑलिम्पिकसारखीच झाली. मिल्खा सिंग यांना रोममध्ये झालेल्या 1960 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत फक्त 0.01 सेकंद इतक्या फरकाने पदक गमवावं लागलं होतं.
चार वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या मिल्खा सिंग यांनी अनेक पदकं मिळवली. मात्र रोम ऑलिम्पिकमधील त्यांच्या पराभवाची चर्चा आजही होते. मिल्खा सिंग यांनी 1965, 1960 आणि 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. यात 1960 ला झालेल्या रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंह 400 मीटरच्या अंतिम शर्यतीत फक्त 0.01 सेंकदामुळे पराभूत झाले होते. तेव्हा मिल्खा सिंगच सुवर्णपदक जिंकतील असं वाटत होतं. अगदी शर्यतीत ते पुढेही होते. पण अखेरच्या क्षणी ते चौथ्या स्थानावर राहिले.
रोम ऑलिम्पिकच्या पाचव्या हिटमध्ये मिल्खा सिंग हे दुसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्येही त्यांनी दुसरं स्थान कायम राखलं. सेमीफायनलनंतर फायनल दोन दिवसांनी झाली होती. या शर्यतीत कार्ल कॉफमॅन पहिल्या लेनमध्ये तर अमेरिकेचे ओटिस डेव्हिस हे दुसऱ्या लेनमध्ये होते. मिल्खा सिंग पाचव्या आणि जर्मनीचा धावपटू सहाव्या लेनमध्ये होते.
फायनल शर्यतीत मिल्खा सिंग 200 मीटरपर्यंत पुढे होते. त्याचेवळी आपण वेगानं धावत आहे आणि शर्यत पूर्ण करता येणार नाही अशी शंका आली. त्यामुळे आपला वेग कमी केल्याचं मिल्खा सिंग यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. तसंच एकदा मागे वळून पाहिलं होतं. त्यानंतर तीन ते चार खेळाडू त्यांच्या पुढे निघून गेले. मिल्खा सिंग यांनी त्यानंतर पुढे जाण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र तोपर्यंत शर्यत संपली होती.
मिल्खा सिंग हे चौथ्या क्रमांकावर राहिल्यानं भारताला पदक मिळालं नव्हतं. पहिल्या चारही जणांचा निर्णय हा फोटो फिनिश तंत्रज्ञानाच्या आधारे काढण्यात आला. त्यात डेव्हिसने कॉफमॅनला सेकंदाच्या शंभराव्या भागाइतक्या वेळेने मागे टाकलं. 44.9 सेंकदाची वेळ नोंदवूनही कॉफमनला मागे टाकून डेव्हिसने बाजी मारली होती. तर तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा माल्कमने 45.5 सेंकदाची वेळ नोंदवली. मिल्खा सिंग 45.6 सेंकदासह चौथ्या स्थानी राहिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.