Ram Nath Kovind : आमटे दाम्पत्याचा देशाने आदर्श घ्यावा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

वरोरासारख्या आदिवासी भागात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी जे मोठे कार्य केले आहे ते इतरांसाठी प्रेरमादायी आहे
Ram Nath Kovind
Ram Nath KovindSakal
Updated on

नवी दिल्ली : वरोरासारख्या आदिवासी भागात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी जे मोठे कार्य केले आहे ते इतरांसाठी प्रेरमादायी आहे. सकारात्मकता व चांगुलपणाची भावना वाढावी यासाठी देशाने या दाम्पत्याचा आदर्श समोर ठेवावा अशा शब्दांत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॉ. आमटे यांचा आज गौरव केला.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चांगुलपणाची चळवळ' या संस्थेच्या वतीने आज दुसरे संमेलन झाले. त्यावेळी कोविंद बोलत होते. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) अरूणकुमार मिश्रा, एअर मार्शल अनील भोसले, संस्थेचे अध्यक्ष ऋषीकुमार आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांत रचनात्मक काम करणाऱयांचाही सत्कार करण्यात आला.

डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी ५० वर्षांपूर्वी वरोरा येथे सुरू केलेल्या आदिवासी समाजातील आपल्या कार्याचे अनेक अनुभव सांगितले. आमच्या कामाचा आत्माच सकारात्मकता आहे कारण त्यावाचून आम्ही या आदिवासी समाजाचा विश्वास कमावू शकलोच नसतो असे सांगून डॉ. आमटे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर २५ वर्षांनीही येथील आदिवासींना शाळा, नागरी जीवन, डॉक्टर, रूग्णालय म्हणजे काय हेही माहिती नव्हते, ज्यांचा बाहेरच्या जगाबरोबर काही संबंधच नव्हता त्यांच्यातील अनेक मुले आज उच्चशिक्षित असून अनेक क्षेत्रे गाजवीत आहेत हे पाहून या आदिवासींचा अभिमान वाटतो.

कोविंद म्हणाले की ‘अर्धा पेला भरलेला‘ हाच दृष्टीकोन प्रत्येकाने बाळगणे आवश्यक आहे. डॉ. आमटे दाम्पत्याचे कार्य खरोखरच देशासाठी मार्गदर्शक आहे. जीवनात सकारात्मकता नसेल तर त्या जगण्याला काही अर्थ नाही. चांगुलपणाची वाढ व्हावी यासाठी आमटे यांच्यासारखे आदर्श सतत डोल्यासमोर ठेवले पाहिजेत. त्यांच्या मार्गदर्शनाची देशाला आज गरज आहे.

न्या. मिश्रा म्हणाले की घटनाकारांनी नागरिकांचे अधिकार व त्यांच्या जबाबदाऱया- कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. अधिकार हवेत पण जबाबदाऱया नकोत ही भूमिका चालणार नाही.

मुळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की समाजातून सकारात्मकता कमी होत चालली आहे त्यामुळेहत्या व हिंसक बातम्यांना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जागा मिळते व सकारात्मक बातम्या आत प्रसिध्द केल्या जातात.चांगुलपणावरील विश्वास, तरूण पिढीचा विश्वास वाढावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक भारतीयाने ‘न्याय-समता व स्वातंत्र्य' या गोष्टी अंगीकारल्या तर भारताचा स्वर्ग होईल. भारताने स्वातंत्र्यानंतर लक्षणीय प्रगती केली पण आजही समाजात शोषण व विषमताही आहेत. प्रत्येक भारतीय जेव्हा आपल्यातील सकारात्मकता जागवून आपले सर्वोच्च योगदान देशासाठी देईल तेव्हाच भारत विश्वगुरू बनण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार होईल.

मुळे म्हणाले की या एकदिवसीय संमेलनातल्या सत्रांमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये चांगुलपणा कसा रुजवता येईल यावर सखोल विचार होणार आहे . स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमधल्या भारताचा लेखाजोखा , सामाजिक न्याय व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाकडे जाताना इथून पुढचा २५ वर्षांचा देशाचा प्रवास कसा असावा अशा तीन विषयांवर विविध तज्ज्ञांच्या सहभागात चर्चा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.