गुजरातेत राजकीय नाट्य; विजय रुपानी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
Vijay Rupani Resigns: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना रूपानी यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून हा भाजपच्या परंपरेचा भाग असल्याचे रुपानी यांनी स्पष्ट केले. राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना रूपानी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू. राज्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणुका लढवत आहे आणि २०२२ मधील निवडणूक देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लढली जाईल, असेही स्पष्ट केले.
तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना हटवून विजय रूपानी यांनी 7 अगस्त 2016 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ते राजकोट पश्चिम मतदार संघातील आमदार आहेत. त्यानंतर 2017 मधील विधानसभा निवडणूक भाजपने विजय रुपानी यांच्या नेतृत्वात लढली. विजय रुपानी यांनी 26 डिसेंबर 2017 रोजी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकून बहुमत मिळवले होते. विधिमंडळाच्या बैठकीत रूपानी यांना पक्षनेतेपदी निवडले तर नितीन पटेल यांना उपनेते म्हणून निवडण्यात आले होते. आता पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून विजय रुपानी राजीनामा देणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी आताच राजीनामा का दिला? याबाबतची चर्चा सुरु आहे. पण असं म्हटले जातेय की, विजय रुपानी भाजपच्या गुजरात विधानसभा विजय अभियानामध्ये बसत नाहीत. पाहूयात... विजय रुपानी यांच्या राजीनाम्यामागे काय कारणं असू शकतात.... ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
गुजरातेत बदलाचे वारे
गुजरातमध्ये अनेक दिवसांपासून नेतृत्व बदलाबाबत तर्कवितर्क लावले जात होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुरूवारी रात्री अचानक अहमदाबादला पोचले होते. त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत गजरात दौऱ्याचा उल्लेख नव्हता. परंतु रुपानी यांच्या राजीनाम्यानंतर शहा यांच्या भेटीचे गूढ उकलल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
प्रभाव पाडण्यात अपयशी?
विजय रुपानी यांनी पाच वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला. मात्र, ते राजकीय प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याचं मत राजकीय जानकरांनी व्यक्त केलं. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप नरेंद्र मोदी यांच्यामुळेच विजयी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी गुजरातमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. भाजपने सत्ता कायम राखली होती मात्र, 182 पैकी फक्त 99 जागांवर विजय मिळवता आला होता. तर काँग्रेसने 77 जागांवर बाजी मारली होती. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने रुपानी यांचा पत्ता कट केल्याचं बोललं जात आहे.
जातीय समीकरणात अनफीट?
विजय रुपानी हे जैन समाजाचे आहेत. गुजरातच्या एकूण लोकसंख्येत या समाजाची संख्या फक्त दोन टक्के आहे. पुढील मुख्यमंत्री पाटीदार असावा, अशी मागणी या समाजाच्या नेत्यांनी अलीकडेच केली होती. त्यामुळे जातीय समिकरणामुळे रुपानी यांचा पत्ता कट झाल्याच सांगितलं जात आहे. तसेच नितीन पटेल आणि मांडवीय हे प्रभावी अशा पाटीदार समाजाचे असल्याने त्यांची नावे आघाडीवर आहेत.
कोरोना संकट हाताळण्यात अपयश -
रुपानी यांची मुख्यमंत्रीरदाची खुर्ची जाण्यात कोरोना महामारी एक महत्वाचं कारण आहे. गुजरातमध्ये कोरोना महामारी हाताळण्यात रुपानी यांना अपयश आलं. त्यामुळे विरोधी पक्षाने भाजप अन् मोदी यंना लक्ष केलं होतं. तसेच गुजरात उच्च न्यायालयानेही प्रश्न उपस्थित केले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुजरातमधील नागरिकांनी रुपानी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी रुपानी यांचा राजीनामा घेतला.
राजीनाम्यामागे पक्षातंर्गत मतभेद?
रुपानी आणि भाजप पक्षात बऱ्याच दिवसांपासून मतभेद असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील आणि रुपानी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. गेल्यावर्षीच राज्य भाजपने रुपानी यांच्याविरोधात अहवाल दिला होता. तसेच रुपानी यांच्या नेतृत्वात कामकाजात शिथिलता आल्याचे राजकीय तज्ञ सांगत आहेत.परिणामी सरकारची प्रतिमा खराब झाली होती. त्याचवेळी गुजरात भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचा दावा रूपानी यांनी केला आहे.
रोजगार - नोकरी :
इतर राज्यांप्रमाणेच गुजरातमध्येही रोजगार-नोकरी हा निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा ठरला आहे. यावरुन विरोधकांनी भाजपला वारंवार लक्ष केलं आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये भाजपला काँग्रेस हा एकच विरोधक होता. मात्र, आम आदमी पार्टीनेही यामध्ये उडी घेतली आहे. विरोधकांनी नोकरी-रोजगारांसोबत विकासाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला हातळण्यासाठी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलला आहे.
सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले -
भाजपे सत्ता असलेल्या राज्यात मागील सहा महिन्यांत पाचमुख्यमंत्री बदलले आहेत. 2014 मध्ये कितीही विरोध अथवा टीका झाली तरीही मुख्यमंत्री बदलण्याचे टाळणाऱ्या भाजपने आता नवीन प्लॅन आखल्याचं दिसतेय. लोकांची नाराजी, पक्षनेतृत्वाचा विश्वास गमाविणे किंवा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवूनच भाजपने मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंड, आसाम, कर्नाटक आणि आता गुजरातमध्ये भाजपने मुख्यमंत्री बदलले आहेत.
चौघांची नावे चर्चेत
रूपानी यांच्या राजीनाम्यानंतर कोणाकडे नेतृत्व येणार यावरून चर्चा सुरू झाली आहे. यात आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, केंद्रीय मंत्री पुरुषत्तोम रूपाला, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर.पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. यापैकी एका नावावर रविवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
राजीनामा दिल्यानंतर रुपानी काय म्हणाले?
गुजरातच्या विकासाच्या प्रवासात आपल्याला योगदान देण्याची संधी मिळाली आणि त्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. मला पाच वर्षाची जबाबदारी देण्यात आली होती आणि ती पूर्णपणे पार पाडली. गुजरातच्या विकासाची यात्रा ही नवीन उत्साह आणि नवीन नेतृत्वाखाली पुढे सुरू राहिल. काळानुसार कार्यकर्त्यांच्या जबाबदारीत बदल करणे ही भाजपची परंपरा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.