नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत नऊ आणि दहा सप्टेंबरला होणाऱ्या ‘जी-२०’ शिखर परिषदेनिमित्त सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार असून, सुरक्षेच्याकारणास्तव अनेक भागांत वाहतुकीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. या कालावधीत शाळा-महाविद्यालये, रेस्टॉरंट, मॉल आणि कार्यालयेही बंद ठेवण्यात येणार आहेत.
परिषदेसाठी जगातील विविध देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान राजधानीत २४ तास तैनात राहणार असल्याने दिल्लीला या काळात छावणीचे रूप येणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह जवळपास २० देशांचे प्रमुख या काळात दिल्लीत असणार आहेत. यासाठी दिल्लीतील प्रमुख हॉटेल आरक्षित करण्यात आली आहेत. ताज पॅलेस, आयटीसी मौर्य, क्लेरीजेस, ली मेरिडियन, शेरॉटेन या पंचतारांकित हॉटेलमध्ये या अतिथींच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
त्यामुळे या हॉटेलच्या भोवतीही २४ तास बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ‘जी-२०’ परिषद प्रगती मैदान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम’ येथे होणार आहे. यामुळे प्रगती मैदानालाच लागून असलेले सर्वोच्च न्यायालयसुद्धा या काळात बंद ठेवण्यात येणार आहे.
या काळात दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेतही अनेक बदल करण्यात येणार आहेत. केवळ वस्तूंची ने-आण करणारी वाहने सोडून इतर वाहनांना राजोकारी सीमेकडून दिल्लीत प्रवेश करावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील वाहतूक ही राव तुलाराम मार्गावर वळविण्यात येणार आहे.
दिल्लीतील मथुरा मार्ग, भैरो मार्ग, पुराना किल्ला, प्रगती मैदान, ल्युटियन्स झोन हे परिसर सात ते दहा सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात येथील सरकारी व खासगी कार्यालयेसुद्धा बंद राहणार आहेत.
तसेच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पास दिले जाणार आहे. दिल्लीतील प्रमुख कार्यालये ल्युटियन्स झोनमध्येच आहेत. त्यामुळे ही कार्यालये बंद राहणार असल्याने, नेहमीच गजबज असलेला हा भाग पोलिसांच्या नियंत्रणात राहणार आहे. याशिवाय कॅनॉट प्लेस, खान मार्केट, जनपथ मार्केट यांसारख्या देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या बाजारपेठाही बंद राहणार आहे.
पर्यटनस्थळांवरही निर्बंध लावणार
‘जी-२०’ परिषदेच्या काळात राजधानी नवी दिल्लीतील बंदोबस्तासाठी दिल्ली पोलिस, सीआरपीएफ आणि आयटीबीपीचे सात हजार जवान तैनात केले जाणार आहेत. या काळात दिल्लीतील पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात येणार आहेत. विविध देशांच्या प्रमुखांबरोबर आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना राजधानी दाखविण्याची आणि येथे फिरण्याची विशेष व्यवस्था केली जाणार आहे.
त्यांना लाल किल्ला, कुतुबमिनार, अक्षरधाम मंदिर, हुमायून टोम्ब, अग्रसेन की बावडी, जंतरमंतर सारख्या ऐतिहासिक वास्तू दाखविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पर्यटकांना या काळात दिल्लीत फिरता येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.