नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दहा वर्षांच्या कार्यकाळात केलेला नागपूर शहराचा विकास आणि त्यांच्या विरुद्ध लढत असलेले ज्यांच्या नावातच ‘विकास’ आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यात नागपूर लोकसभा मतदारसंघात थेट लढत होत आहे. त्यामुळे गडकरींच्या ‘विकासा’विरुद्ध काँग्रेसचा ‘विकास’ असा सामना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे.
गडकरी यांची लोकप्रियता अफाट आहे. रस्ते आणि उड्डाणपुलांच्या बांधणीतून त्यांनी शहराचे रुपडे पालटले आहे. हे त्यांचे विरोधकही खाजगीत मान्य करतात. गडकरींनी पाच वर्षे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांची मेजवानी दिली. त्यांच्या ‘खासदार सांस्कृतिक’ व ‘खासदार क्रीडा महोत्सवा’ने या दोन्ही क्षेत्रातला शहराचा अनुशेष भरून काढला. त्यांच्या ‘ॲग्रोव्हिजन'' प्रदर्शनाने देशपातळीवर नागपूरचे नाव झळकले आहे. दुसरीकडे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचीही काळजी ते घेत आले आहेत. गोरगरीब दिव्यांग आणि ज्येष्ठांना काठी वाटपापासून आवश्यक ते साहित्य ते पुरवत असतात. गल्लोगल्ली भाजप कार्यकर्त्यांची फळी आहे. ही गडकरींची जमेची बाजू आहे.
त्यांच्या तुलनेत युवा असलेल्या विकास ठाकरेंना काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. ते शहराचे महापौर होते. सध्या ते आमदार व कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे. भाजपतील अनेक नेते त्यांचे मित्र आहेत. ओबीसी, दलित, मुस्लिम आणि हलबा या काँग्रेसच्या परंपरागत मतांची व्यवस्थित बांधणी केल्यास गडकरींना पराभूत करता येऊ शकते, असे समीकरण सध्या मांडले जात आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांच्यासाठी शहरातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते सध्या एकत्र आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने कागदावर मांडलेले समीकरण तंतोतंत प्रत्यक्ष मतदानात उतरल्यास नागपूरमध्ये कडवी लढत होऊ शकते.
‘विकास की भकास’
भाजपतर्फे शहराचा विकास व गडकरींच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला जात आहे. स्वतः गडकरी मोठ्या सभा टाळून समाजातील विविध घटक, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींसोबत वैयक्तिक संवाद साधत आहेत. जाहीरनाम्याच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी काय हवे, याचे आवाहन त्यांनी केले आहे. काँग्रेसचा गडकरींच्या विकासावर आक्षेप आहे. गरज नसताना सिमेंट रोड व उड्डाण पूल बांधल्याचा आरोप ते करतात. रस्ते उंच केल्याने पावसाळ्याचे पाणी घरांमध्ये शिरत आहे. काँक्रिट रस्त्यांमुळे तापमानात वाढ झाली आहे. विकासाच्या नावावर मनमानी कारभार, पैशाची उधळपट्टी सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
भाजपची तगडी ताकद
नागपुरातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन मते, विकास कुंभारे आणि कृष्णा खोपडे यांचा समावेश आहे. ठाकरेंच्या पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजपचा उमेदवार अवघ्या सहा हजार मतांनी पराभूत झाला. पंधरा वर्षांपासून नागपूर महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. दीडशेपैकी १०८ नगरसेवक भाजपचे होते. या निवडणुकीत विकास ठाकरे स्वतः पराभूत झाले होते. नंतर काँग्रेस नगरसेवकांचे दोन गट पडले होते. असंतुष्टांनी प्रचंड विरोध करून विकास ठाकरे यांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत येऊ दिले नव्हते.
थेट लढतीचा फायदा कुणाला?
आजवरच्या निवडणुकीत भाजपने मतविभाजनाची बारकाईने काळजी घेतल्याचे दिसून येते. बसप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाजपच निवडते, अशी शंकाही यापूर्वी व्यक्त केली जात होती. यावेळी मात्र गडकरी म्हणा वा भाजप या भानगडीत पडले नसल्याचे दिसून येते. ‘वंचित’ने इथे काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. बसपचा उमेदवार एका माजी नगरसेविकेचा पती आहे. मुस्लिमांची मते घेणाऱ्या ‘एमआयएम’कडे यावेळी उमेदवारही नाही. हे बघता मतविभाजन फारसे होणार नाही. ही मते काँग्रेसकडे वळणार आहेत. अशा परिस्थितीत गडकरी पाच लाखांच्या मताधिक्क्यांनी निवडून येणार असल्याचा दावा करीत आहेत. मागील निवडणुकीत नाना पटोले यांना दोन लाखांच्या मताधिक्क्यांने गडकरींनी पराभूत केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.