पणजी : गोव्यात सहा महिन्यांच्या शांततेनंतर पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विरोधात असलेल्या गोवा फॉरवर्डच्या तीन आमदारांनी आज मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर गोव्यातही राजकीय भूकंप होईल, असे राऊत यांनी जाहीर केल्यानंतर गोव्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राजधानी पणजीपासून साठ किलोमीटर अंतरावरील काणकोण येथे आहेत. तेथे चौपदरी महामार्गाच्या उद्घटनासाठी ते गेले आहेत. मुंबईत ही घडामोड घडत असताना मुख्यमंत्री काणकोणमधील कार्यक्रमात चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता शांतपणे सहभागी झालेले आहेत.
असे आहे संख्याबळ!
गोव्याच्या विधानसभेत ४० आमदार असून त्याचे संख्याबळ असे भाजप -२७, कॉंग्रेस-५, गोवा फॉरवर्ड-३, अपक्ष-३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष १, राष्ट्रवादी कॉंग्रेस १. सरकारसोबत दोन अपक्ष, मगोचा व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी आमदार आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने सध्याच्या घडीला ४० पैकी ३१ आमदार आहेत. विधानसभेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती तेव्हा भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या तेव्हा तीन अपक्ष, गोवा फॉरवर्डचे तीन, मगोचे तीन, राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या पाठिंब्याने भाजपने सरकार स्थापन केले होते. त्यानंतर सुभाष शिरोडकर (शिऱोडा) व दयानंद सोपटे (मांद्रे) या कॉंग्रेसच्या आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्याच्या काळात म्हापशाचे आमदार अॅड फ्रांसिस डिसोझा आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यामुळे घेतलेल्या पोट निवडणुकीत भाजपने तीन जागा जिंकल्या. पणजीची जागा कॉंग्रेसने जिंकली. सरकार स्थीर करण्यासाठी मनोहर आजगावकर (पेड़णे) व दीपक पाऊसकर (सावर्डे) मगोचे दोन आमदार भाजपने फोडले व उत्तररात्री दोन वाजता त्यांना भाजपमधये प्रवेश दिला. कॉंग्रेसमघील तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर (केपे), आतानासिओ मोन्सेरात (पणजी), जेनिफर मोन्सेरात (ताळगाव), फ्रांसिस सिल्वेरा (सांतआंद्रे), आंतोनिओ फर्नांडिस (सांताक्रुझ), नीळकंठ हळर्णकर (थिवी), विल्फ्रेड डिसा (नुवे)., फिलीप नेरी रॉड्रिग्ज( वेळ्ळी), क्लाफासियो डायस (कुंकळ्ळी), इजिदोर फर्नांडिस (काणकोण) असा दहा जणांचा गटही भाजपमध्ये दाखल झाला.
काय आहेत राजकीय समीकरणं?
या घडामोडींमुळे सरकारमधून उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड- फातोर्डा) व उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर (मगो- मडकई) यांना काढण्यात आले. विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची कॉंग्रेसने निवड केली. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेची साथ दिल्याने गोव्यातील त्यांचा एकमेव आमदार चर्चिल आलेमाव साहजिकपणे भाजपविरोधी गटात गेला आहे. विधानसभेच्या निवढणुकीपूर्वी माविन गुदिन्हो (दाबोळी) आणि पांडुरंग मडकईकर (कुंभारजुवे) या कॉंग्रेसच्या तत्कालीन आमदारांना भाजपने आपल्या पक्षात घेत उमेदवारी दिली होती. ते निवडणूही आले आहेत. विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर विश्वजित राणे (वाळपई) या कॉंग्रेसच्या आमदाराने आमदारकीची शपथ घेतल्यावर लगेच राजीनामा दिला होता व भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेही आता निवडून आले आहेत. असे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे असलेले १३ जण आता भाजपमध्ये आहेत. ते अन्य काही जणांना घेऊन फुटावेत यासाठी गेले काही दिवस प्रयत्न आहेत. त्याचमुळे बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेला सर्व उपस्थित मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी आम्ही सारे एक आहोतचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गुरुवारी गोवा फॉरवर्डचे तिन्ही आमदार (विजय सरदेसाई, विनोद पालयेकर आणि जयेश साळगावकर) हे राज्यपाल सत्यपाल मलीक यांना भेटून राज्यातील प्रशासन ठप्प झाल्याची तक्रार केली होती. आज त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली त्यामुळे भाजपसमोरील कटकटी वाढवण्यात आता सरदेसाई सक्रीय झाल्याचे दिसते. मात्र, भाजपमधील मोठा गट बाहेर पडल्याशिवाय गोव्यात कोणताही राजकीय भुकंप होणार नाही हेही तेवढेच खरे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.