चला गोव्याला; ऑक्टोबरमध्येही अनुभवा अल्हाददायक वातावरण

goa pleasant weather attracting tourists after kyaar cyclone
goa pleasant weather attracting tourists after kyaar cyclone
Updated on

पणजी : लांबलेला पावसाळ्याने गोव्यातील भातशेतीचे मोठे नुकसान केले असले तरी राज्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या पर्यटन व्यवसायासाठी पाऊस लाभकारकच ठरत असल्याचे दिसत आहे. एरव्ही ऑक्टोबरमध्ये वाढलेल्या तापमानामुळे पर्यटकांना गोव्यात भाड्याने मिळणाऱ्या दुचाक्यांवर स्वार होत रपेट करणे थोडे कठीण होत, असे पण सध्या पावसाळी हवामानामुळे हवेत असलेला गारवा पर्यटकांच्या पथ्यावरच पडत आहे.

गेल्या शनिवारी क्यार चक्रीवादळाच्या परिणामामुळे किनारी भागात समुद्राचे पाणी घुसले होते. कमी अवधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे गोव्यातील पर्यटनाला त्याचा फटका बसेल, असे वाटत होते. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी हवामान सामान्य झाले आणि पर्यटन व्यावसायिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

किनाऱ्यावर शॅक नाहीत; दूधसागर मार्ग खुला
यंदा न्यायालयीन खटल्यांमुळे किनाऱ्यावर शॅक घालणे थोडे लांबले आहे. एरव्ही ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किनाऱ्यावर शॅक उभे राहतात यंदा अद्याप परवान्यांचे पर्यटन खात्याने वितरण न केल्याने शॅक उभे राहू शकलेले नाहीत. दूधसागर धबधब्याच्या पर्यटनाला पावसाळ्यातील तीन महिन्यांच्या खंडांनंतर आता सुरवात झाली आहे. कुळे ते दूधसागर अशा फेऱ्या मारणाऱ्या जीप व्यावसायिकांची रोजी रोटी त्यावर अवलंबून असते. पावसाळी हवामानामुळे सरकारने दूधसागर पर्यटनावर बंदी घातली होती ती आता मागे घेण्यात आली आहे.

हिवाळा-पावसाळ्याचा एकत्रित अनुभव
देशभरात दिवाळीची सुटी सध्या सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर देशी पर्यटक गोव्यात येत आहेत. वातावरण काहीचे ढगाळ असल्याने तापमानाची तीव्रता त्यांना जाणवत नसल्याने हिवाळा आणि पावसाळा एकत्रित अनुभवत पर्यटक हिंडताना दिसत आहेत.
मुरगाव बंदराच्या बाह्य भागात नांगरण्यात आलेले आणि वादळी वातावरणामुळे दोनापावलच्या किनाऱ्यालगत वाहून आलेले नू शी नलीनी हे नाफ्तावाहू जहाज किनाऱ्यालगतच्या खडकांवर आदळून फुटेल की काय, अशी शंका होती. मात्र, ते खडकावर रुतून बसले आहे. त्या जहाजात दोन हजार लीटर नाफ्ता आहे. ते जहाज फुटल्यास किनारी पर्यावरण व पर्यटनाला त्याचा मोठा फटका बसणार होता. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित हालचाली करून केंद्र सरकारकडून आपत्तकालीन स्थिती हाताळण्याची मदत मिळवली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायासमोरील संकट दूर झाले आहे. थॉमस कुक ही कंपनी दिवाळखोरीत गेल्याचा मोठा फटका गोव्याला बसणार आहे.

विदेशी पर्यटकही येणार
विदेशी पर्यटकांना चाटर्ड विमानांतून आणण्याचे काम ही कंपनी वर्षानुवर्षे करत आहे. त्याला पर्याय म्हणून ब्रिटनमधून चाटर्ड विमाने आणण्याचे प्रयत्न करण्यात येत असून काही देशांत एअर इंडियाने विमाने पर्यटकांना आणण्यासाठी पाठवावीत यासाठीही सरकारचे प्रयत्न आहेत. नौदलानेही आपल्या सरावाच्या वेळेपैकी काही वेळ धावपट्टी चाटर्ड विमाने उतरवण्यासाठी देण्याचे मान्य केल्याने यंदा पर्यटन हंगाम नेहमीप्रमाणेच असेल असे अनुमान काढता येते.


देशी, विदेशी पर्यटकांच्या संख्येत यंदा वाढच झालेली दिसेल. मध्यंतरीच्या काळात पायाभूत सुविधांचा विकास करत केवळ किनारी पर्यटन ही असलेली गोव्याची ओळख आता ३६५ दिवस पर्यटन क्षेत्र म्हणून केली आहे.
मनोहर आजगावकर, पर्यटनमंत्री

सरकारने नाफ्तावाहू जहाजाची परिस्थिती अत्यंत योग्यप्रकारे हाताळली. सरकारी यंत्रणा गतिमान झाल्यामुळेच या जहाजाच्या रुपाने पर्यटन व्यवसायावर आलेले संकट टळले आहे.
सावियो मासाईश, अध्यक्ष टूर अँड ट्रॅव्हल असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.