Gujarat Fire News : राजकोटमध्ये २४ जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये नऊ मुले; २५ जणांची सुटका

Gujarat Fire News : राजकोटमध्ये २४ जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये नऊ मुले; २५ जणांची सुटका
Updated on

Rajkot Fire : गुजरातमधील राजकोट शहरात कालावड रोडवरील गेम झोनमध्ये शनिवारी सायंकाळी आगीचा मोठा भडका उडाला. यामध्ये २४ जणांचा अक्षरशः कोळसा झाला असून मृतांमध्ये नऊ मुलांचाही समावेश आहे. सुरक्षा दलांना २५ जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आल्याचे समजते. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने राज्यातील सर्व गेम झोन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने येथील ‘टीआरपी गेम झोन’मध्ये मोठ्या संख्येने लहान मुले त्यांच्या पालकांसोबत आली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या झोनला भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने सगळा गेम झोनच गिळंकृत केला. आतील लोकांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. हे वृत्त समजताच मदत आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

ही आग नेमकी कशामुळे लागली? हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही असे राजकोट महापालिकेचे आयुक्त आनंद पटेल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी अनेक लोक हे गेम झोनमध्ये अडकलेले असू शकतात अशी भीती माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. अग्निशामन दलाच्या आठ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिल्या आहेत.

मालकावर गुन्हा
या गेम झोनची मालकी युवराजसिंह सोळंकी नावाच्या व्यक्तीकडे असल्याचे समजते. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका हिंदी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे. या गेम झोनच्या जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला सुरूवातीला ही आग लागली आणि काही क्षणांमध्ये ती पसरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. केवळ ३० सेकंदांमध्ये आगीने हा सगळा गेम झोन वेढला.

ओळख पटवावी लागणार
आतापर्यंत वीस मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले असून त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांना येथील रुग्णालयात आणण्यात आले आहे. तूर्त आग नियंत्रणात आली असून अन्य मृतदेहांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी त्यांची डीएनए चाचणी घेण्यात येईल. आग लागल्यानंतर सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत होते. हे लोट पाच किलोमीटर अंतरापर्यंत पसरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.