वायनाड (केरळ) : अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनानंतर केरळच्या वायनाड जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील चार गावे जमिनीमध्ये गडप झाली. काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. शेकडो श्वास चिखलामध्ये अडकले. आभाळच फाटलं तिथं मदत कोण आणि कशी पुरविणार? पीडितांच्या व्यथा सरकारी यंत्रणेपर्यंत तरी कशा पोचणार? हा मोठा प्रश्न होता. हे आव्हान स्वीकारले स्थानिक हौशी हॅम रेडिओ जॉकींनी आणि या संकट काळामध्ये त्यांनी संवादाचा पूल उभारला. यामुळे मदत कार्याला वेग तर आलाच पण त्याचबरोबर अनेकांचे प्राणही वाचले.
स्थानिक स्वयंसेवक बनलेल्या ऑपरेटरनी पुढाकार घेत कालपेट्टा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळघरामध्ये ही रेडिओ प्रणाली उभारण्याचे काम केले. या रेडिओच्या माध्यमातून नेमकी कोठे काय परिस्थिती होती? याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना कळत होती. भूस्खलनानंतर वायनाडमधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. अनेक भागांमधील मोबाइल सेवाही ठप्प झाली होती. अशा स्थितीमध्ये जिल्हाधिकारी डी.आर. मेघश्री यांनी स्थानिक हॅम रेडिओ ऑपरेटरची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यामुळे नवी संवाद प्रणाली तयार होऊ शकली. हे हॅम रेडिओ स्टेशन चालविण्यासाठी रिसीव्हर, ॲम्पलीफायर, संगणकीय डिजिटल मॉड्यूलेशनचा आधार घेण्यात आला होता.
ऑपरेटरची कामगिरी
हॅम रेडिओ ऑपरेटरनी प्रत्यक्ष ज्या भागात भूस्खलन झाले आहे त्या ठिकाणची माहिती रेडिओ ट्रान्समीटरच्या माध्यमातून स्टेशनपर्यंत पोचविण्याचे काम केले. अम्बालावायल पोनुमुडी कोट्टा येथे यासाठी रिपीटर सेटअप उभारण्यात आला होता. हॅम रेडिओ ऑपरेटरची संघटना असलेल्या ‘सुलतान बॅथरी डीएक्स असोसिएशन’ने हे शिवधनुष्य उचलले होते.
पथकाची अहोरात्र मेहनत
संघटनेचे अध्यक्ष साबू मॅथ्यू यांच्या नेतृत्वाखाली हॅम रेडिओ ऑपरेटरचे एक पथक अहोरात्र मेहनत घेत होते. वरिष्ठ हॅम रेडिओ ऑपरेटर डॉ. अब्राहम जेकॉब यांनी समन्वय ठेवण्याचे काम केले. ते येथील स्थानिक रुग्णालयात डॉक्टर आहेत. ही मंडळी चोवीस तास भूस्खलन झालेल्या भागातील माहिती प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोचविण्याचे काम करत होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.