गेल्या अनेक दशकांच्या दृष्टीनं 2021 हे वर्ष खूपच वाईट ठरलं, कारण..
Happy New Year 2022 : गेल्या अनेक दशकांच्या दृष्टीनं 2021 हे वर्ष खूपच वाईट ठरलं. कारण, या वर्षात कोरोनाचा (Coronavirus Cases in India) विळखा सुटतो ना सुटतो तोच ओमिक्रॉन विषाणूनं आपल्याला जखडलं. त्यामुळं नवीन वर्षाचा उत्सव फिका पडलेला पहायला मिळाला. वर्षाच्या शेवटी देशात ओमिक्रॉनची (Omicron Virus) 1200 हून अधिक प्रकरणं समोर आली. 2020 प्रमाणं 2021 ला देखील या महामारीचा फटका बसला आणि आता 2022 ला सुरुवात होत आहे. नवीन वर्ष आपल्यासाठी सुख-समृद्धीचं वर्ष ठरो, हीच अपेक्षा सर्वांच्या मनात असेल. चला तर जाणून घेऊ.. या नवीन वर्षात देशातील 'या' 5 मोठ्या समस्या सुटू शकतात का?
2021 मध्ये कोरोना व्हायरसनं देशात कहर केला. या महामारीमुळं सर्वाधिक नुकसान झालेल्या देशांमध्ये भारताचं नाव आघाडीवर आहे. एप्रिल-मेमध्ये कोरोनाचा कहर इतका होता की, देशात दररोज 4 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळं देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. काल (शुक्रवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जवळपास 64 दिवसांनंतर कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांनी 16,000 चा टप्पा ओलांडला असून देशातील कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या 3,48,38,804 वर पोहोचलीय. वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका दिवसात संसर्गाचे 16,794 नवीन रुग्ण आढळले, तर 220 रुग्णांच्या मृत्यूमुळं मृतांची संख्या 4,81,080 वर पोहोचलीय. आता ओमिक्रॉननं कहर करायला सुरुवात केलीय. जरी ओमिक्रॉनची प्रकरणं केवळ 1300 हून अधिक असली, तरी हा विषाणू वेगानं वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या संकटात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. त्यामुळं बेरोजगारीही वाढलीय. 2021 हे वर्ष भारतात 8.01 टक्के बेरोजगारी दरानं संपत आहे, जे जानेवारीत 6.52 टक्के होतं. निराशेचे प्रमुख कारण म्हणजे, शहरी भागातील बेरोजगारीचा दर, जो जानेवारीत 8.09 टक्के होता. 30 डिसेंबर रोजी 9.26 टक्क्यांवर पोहोचला, तर ग्रामीण भागात तो 5.81 टक्क्यांच्या तुलनेत 7.44 टक्क्यांवर पोहोचला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 9.06 टक्के होता. शहरी भागांसाठी ते 9.15 टक्के इतके जास्त होते. कोरोना संकटाच्या काळात वेगाने वाढणारा बेरोजगारीचा दर कसा कमी करायचा आणि त्यावर नियंत्रण कसं ठेवायचं हे सरकारसमोर आव्हान आहे.
कोरोना महामारी व्यतिरिक्त देशात अशा अनेक समस्या आहेत, ज्यामुळं देशाला त्रास होतोय. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं अलीकडेच संसदेत माहिती दिली होती, की 2019 मध्ये खड्ड्यांमुळं महामार्गावर 4,775 अपघात झाले आहेत, तर 2020 मध्ये एकूण 3,564 अपघात झाले आहेत. 2019 मधील मागील वेळेच्या तुलनेत 2020 मध्ये कमी अपघात (Accident) झाले आहेत, परंतु तरीही धोकादायक कायम आहे. फेब्रुवारीत जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलंय, की भारतात दरवर्षी सुमारे 4.5 लाख रस्ते अपघात होतात, ज्यात 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतात होत असल्याचंही अहवालात म्हटलंय. जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलंय, की गेल्या दशकात 1.3 दशलक्ष लोक भारतीय रस्त्यावर मरण पावले आणि 5 दशलक्ष लोक जखमी झाले. रस्ते अपघातांमुळं भारताचं 5.96 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय, असं अहवालात नमूद केलंय.
आपला देश वर्षभर कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तींनी (Natural Disasters) ग्रासलेला असतो. स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) नोव्हेंबरमध्ये जारी केलेल्या अहवालात म्हटलंय, की 2001 पासून 100 कोटी लोक नैसर्गिक आपत्तींमुळं ग्रासले आहेत, तर यात 83,000 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. 1991 ते 2021 या कालावधीत देशातील एकूण नुकसानीपैकी केवळ आठ टक्के नुकसान भरून काढलंय. त्यामुळं या कालावधीत सुरक्षेत सुमारे 92 टक्के अंतर आहे. 2020 च्या पुरामुळं एकूण आर्थिक नुकसान $ 7.5 अब्ज किंवा 52,500 कोटी रुपये होतं. SBI समुहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष म्हणाले, 1900 पासून आमचा महसूल $144 अब्ज कमी झाला आहे. नैसर्गिक आपत्तीत पुरामुळं सर्वाधिक $86.8 अब्ज आणि नंतर $44.7 बिलियनचं नुकसान झालंय.
अलिकडच्या काळात देशात द्वेषपूर्ण भाषणाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालीय. नुकतेच हरिद्वार येथील धर्म संसदेत अल्पसंख्याक समाजाविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण प्रकरणानं पेट घेतला. या प्रकरणावर 5 माजी लष्करप्रमुखांसह देशातील 100 हून अधिक प्रमुख व्यक्तींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून निषेध केला. 17 ते 19 डिसेंबर दरम्यान हरिद्वार येथे धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होतं. यापूर्वीही अनेक ठिकाणी द्वेषपूर्ण भाषणाची प्रकरणं समोर आली आहेत. अशा स्थितीत 2022 मध्ये द्वेषपूर्ण भाषणाची प्रकरणं संपून परस्पर सौहार्द राखणं आवश्यक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.