चंदीगड- हरियाणा सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी हरियाणा कॅबिनेटने आणखी दहा पिकांचा समावेश किमान आधारभूत किंमतीमध्ये केला आहे. याचा अर्थ आणखी दहा पिके एमएसपीच्या दराने खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे हरियाणामधील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी कुरुक्षेत्र येथील शंखनाद रॅलीमध्ये राज्य सरकार सर्व पिके एमएसपीच्या दराने खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कॅबिनेटमध्ये यासंदर्भातील निर्णय झाला आहे. याशिवाय सैनी यांनी कॅनल वॉटर इरिगेशनसाठी आकारले जाणारे शुल्क माफ करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.