Haryana School Bus Accident: हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात गुरुवारी एका शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला, यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर इतर २० जण जखमी झाले. स्कूलबसचा ड्रायव्हर हा दारुच्या नशेत धुंद होता, स्थानिकांनी त्याला अडवण्याचा, बसची चावीही काढण्याचा प्रयत्न केला पण शाळेच्या चुकीमुळेच हा अपघात घडला असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. (haryana school bus accident children many time said to driver please slow down mahendargarh driver drunk)
तर हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात झालेल्या या भीषण अपघातप्रकरणी पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि बस चालकासह तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 8.30 च्या सुमारास कनिना उपविभागातील उन्हाणी गावात स्कूल बस उलटली, ज्यामध्ये 6 मुलांचा मृत्यू झाला.
सत्यम, युवराज, वंश, रिकी, अंशू आणि यकुश अशी मृत मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी आरोपी ड्रायव्हर धर्मेंद्र हा बस खूप वेगाने चालवत होता, त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि बस सरळ जाऊन एका झाडाला धडकली, त्यामुळे हा भीषण अपघात झाला.
पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणीनंतर बस चालवणारा चालक दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळावरूनच त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका दीप्ती आणि शाळेचे मालक होशियार सिंग यांना अटक केली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, १२ वीच्या विद्यार्थ्याच्या एफआयआरनुसार, बसमध्ये बसलेल्या मुलांनी ड्रायव्हरला वारंवार गाडी हळू चालवण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी आरोपी चालकाने मुलांना धमकावले. यावेळी बसमध्ये एकही मदतनीस नव्हता. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन मुलांचा समावेश आहे.
धनोंडा येथील इयत्ता 9वीत शिकणाऱ्या आदित्यने सांगितले की, ड्रायव्हर वेगात गाडी चालवत होता. बस झाडावर आदळताच त्याने उडी मारली. मुलाने सांगितले, 'बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती एका झाडावर आदळली. खिडक्या तुटल्याने बसच्या पुढील व शेवटच्या रांगेत बसलेले विद्यार्थी जखमी झाले. बस झाडावर आदळताच बस चालकाने बसमधून उडी मारली.
अपघाताप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ड्रायव्हर धर्मेंदरसह शाळेच्या मुख्याध्यापिका दिप्ती आणि एक अधिकारी होशियार सिंह यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितलं की, अपघातस्थळावरुन धर्मेंदर याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या वैद्यकीय तपासणीत तो दारुच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
गुरुवारी देशभरात रमजान ईद निमित्त शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तरीही जीएल पब्लिक स्कूलनं शाळा सुरु ठेवल्यानं या शाळेवर संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी महेंद्रगडच्या उपायुक्त मोनिका गुप्ता यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवत, ईदची सुट्टी असतानाही ही शाळा सुरु ठेवल्यानं राज्य सरकारनं या शाळेची मान्यता रद्द करावी, असं म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.