डेहराडून/जम्मू - उत्तर भारतात बहुतांश भागात पावसाचा जोर कायम आहे. काश्मीर, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी भागात पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. उत्तरकाशीत शुक्रवारी रात्री ढगफुटी झाल्याने हाहाकार उडाला. काश्मीरमध्ये डोडा जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. तसेच जम्मू श्रीनगर महामार्गावर दरड कोसळल्याने अमरनाथला जाणाऱ्या भाविकांना काही काळ थांबावे लागले.
उत्तरकाशीतील पुरोला, बडकोट, नौगांव मोरी क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तरकाशीत पहाटे दोनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळपर्यंत सुरू होता. पावसामुळे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग धरासू बँड आणि गंगनानी येथे बंद करण्यात आला. मात्र तातडीने काम करत तो पुन्हा सुरू केला. रस्ते, शेती आणि दुकान, घराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शनिवारी सुटी जाहीर केली.
अतिवृष्टीमुळे पुरोला, नौगाव, बडकोट क्षेत्रातील रस्त्यांची हानी झाली आहे. रस्त्यावर उभे असलेल्या वाहनांचे नुकसान झाले. पुरोला-खलाडी, पुजेली, चपटाडी आदी गावांना जोडणारा पूल वाहून गेला. यमुनोत्री मार्गावर असलेल्या भाविकांच्या एका गाडीवर मातीचा ढिगारा पडला. यात वित्तहानी झाली असून मनुष्यहानीबाबत अद्याप प्रशासनाने सांगितले नाही. मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला.
हथनीकुंडमधून विसर्ग वाढविला
चंडीगड: पंजाब आणि हरियाना येथे गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडल्याने हथनीकुंड धरणांची पातळी वाढत आहे. पावसामुळे पातळी वाढत असल्याने यमुनानगर जिल्ह्यातील हथनीकुंड धरणातून ८७,१७७ क्युसेकवरून पाण्याचा विसर्ग दुपारी १२ च्या सुमारास २,४०,८३२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.
आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत हरियानाच्या अंबाला येथे १४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर रोहतक येथे १४.२ आणि कुरुक्षेत्र येथे १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पंचकुला येथे सर्वाधिक ७१.५ मिलिमीटर पाऊस पडला. पंजाबमध्ये रुपनगर येथे सर्वाधिक ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर अमृतसर, गुरुदासपूर, फहेतगडसाहिब येथे देखील पाऊस पडला. चंडीगड येथे ५३ मिलिमीटर पाऊस पडल्याचे सांगण्यात आले.
भाविकांचा २० वा जत्था रवाना
बनिहाल/जम्मू: जम्मू-श्रीनगर महामार्गावर आज दोन ठिकाणी दरड कोसळल्याने अमरनाथसाठी निघालेल्या तीन हजार भाविकांचा जत्था आज रामबन येथे थांबविण्यात आला. मेहेर आणि दलवस भागात दरड कोसळली होती. मात्र ढिगारे हटविल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली. ३४७२ भाविकांचा समावेश असलेली अमरनाथची २० बॅच आज भगवतीनगर तळावरून १३२ वाहनांतून निघाली.
मात्र महामार्ग बंद असल्याची सूचना आल्याने भाविकांच्या गाड्या चंदरकोटे येथे थांबविण्यात आल्या. रस्ता खुला करण्यात आल्यानंतर भाविकांचा जत्था यात्रेकडे रवाना झाला. दुपारपर्यंत भाविक बनिहालपर्यंत पोचले. यापैकी २५१५ भाविक पहेलगाम मार्गाने अमरनाथला उर्वरित ९५७ भाविक बालतलमार्गे जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत तीन लाख भाविकांनी अमरनाथचे दर्शन घेतले आहे.
चिनाबची पातळी वाढली
जम्मू काश्मीरच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. कथुआ जिल्ह्यातील अनेक भागात उद्या (ता. २३) पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. आज सकाळी चिनाब नदीची पातळी वाढल्याने जम्मूबाहेरील अखनूर सेक्टरमधील गडखल येथील गुज्जर वस्ती जलमय झाली. अखनूर येथे चिनाबने २९.६ फुटाची पातळी गाठली असून पूर पातळी ३२ फूट आहे.
डोडा जिल्ह्यतील कोटा नल्ला येथे आज सकाळी ढगफूटी झाली. त्यामुळे थालिला-चिराला लिंक रोड पाण्याखाली गेला. या ढगफुटीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र अनेक भाग जलमय झाला. बचाव पथक आणि मशिनरीच्या मदतीने ढिगारे बाजूला करण्याचे काम सुरू झाले. डोडा आणि किश्तवाड येथे तिसऱ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली.
यमुनेच्या पातळीत चढ उतार
नवी दिल्ली: दिल्लीत यमुनेची पातळी गेल्या काही दिवसांपासून २०५.३३ मीटर उंचीच्या धोकादायक स्थितीत असताना आज सकाळी त्यापेक्षा कमी पातळीवर आली. केंद्रीय पाणी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत यमुनेची पातळी २०५.३४ मीटर असताना आज सकाळी नऊच्या सुमारास २०५.२९ मीटरवर आली. यात आणखी घसरण होऊ शकते.
मात्र वरच्या भागात येत्या काही दिवसांत विशेषत: हिमाचलप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडला तर यमुनेची पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे हथिनीकुंड येथून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. राजधानी दिल्लीत यमुनेची पातळी पुन्हा वाढल्यास पुनर्वसन कामात अडथळे येऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.