हिमाचलच्या राजकारणात कांगडा जिल्ह्यानंच राजकीय पक्षांसाठी सत्तेचा मार्ग तयार केला आहे. कांगडामधून पक्षाला जितक्या जास्त जागा मिळतील, तितकं सत्तेत येण्याची खात्री आहे, असं मानलं जातं. 1998 पासून हिमाचल प्रदेशच्या राजकारणात निवडणूक-पोटनिवडणुकीचा हा ट्रेंड सुरू आहे.
राज्यात आळीपाळीनं सत्ता गाजवणाऱ्या भाजप आणि काँग्रेसनं या जिल्ह्यातून 9 ते 11 जागा जिंकत राज्याच्या राजकारणात आघाडी घेतली आहे. सत्तेशी संबंधित हे गणित समजून घेत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कांगडा जिल्ह्यावर अधिक भर दिला आहे. यंदा 2022 च्या रणधुमाळीतही दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी रात्रंदिवस घाम गाळला आहे.
कांगडा जिल्ह्यात यापूर्वी 16 विधानसभा मतदारसंघ होते. थुरल विधानसभा मतदारसंघ 2012 मध्ये पुनर्सीमित केल्यानंतर रद्द करण्यात आला. तेव्हापासून कांगडामध्ये आता 15 जागा आहेत. 1998 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं कांगडा जिल्ह्यातून 10 जागांसह दणदणीत विजय मिळवला. काँग्रेस पक्षाला पाच जागा मिळाल्या. एक अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. कांगडामुळं सत्तेचा मार्ग मोकळा झाला आणि राज्यात भाजपचं सरकार स्थापन झालं. 2003 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 11 तर कांगडामधून भाजपनं चार जागा जिंकल्या. एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. कांगडामध्ये आघाडीवर असलेल्या काँग्रेसला सत्तेची चावी मिळाली.
2007 मध्ये भाजपचे नऊ आणि काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झाले होते. बसपाचा आणखी एक अपक्ष विजयी होऊन विधानसभेत पोहोचला होता. त्यानंतर भाजपनं सरकार स्थापन केलं. 2012 मध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार स्थापन झालं, त्या काळातही कांगडा जिल्ह्यातून काँग्रेसनं 10, भाजपनं 3 आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 11 तर काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. अशा परिस्थितीत आता राज्यात भाजपचं सरकार आहे. आता 2022 सालची निवडणूक संपली असून आज 8 डिसेंबरला निकाल लागण्याची प्रतीक्षा आहे. आता कांगडा जिल्ह्यात यावेळी कोणता पक्ष सत्तेचा मार्ग तयार करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
राज्यातील सर्वात मोठा आणि विधानसभेच्या सर्वाधिक जागा असलेला जिल्हा कांगडाला केवळ एकदाच मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. शांता कुमार 1977 मध्ये मुख्यमंत्री झाले. राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका असूनही कांगडाला शांता कुमार यांच्यानंतर दुसरा मुख्यमंत्री मिळालेला नाहीये.
कांगडा जिल्हा प्राचीन काळी त्रिगर्त नावानं ओळखला जात होता. येथील राजकीय आणि सांस्कृतिक वारसाही खूप जुना आहे. त्रिगर्तचा राजा सुशर्मा यांचा उल्लेख महाभारतातही येतो. सुशर्मा यांनी कौरवांच्या बाजूनं महाभारत युद्ध लढलं. अशा रीतीनं देशाच्या प्राचीन राजकारणातही कांगडाची भूमिका महत्वाची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.