जमशेदपूर/रांची : झारखंडमधील सरायकेला-खरसावां जिल्ह्यात आज पहाटे हावडा-मुंबई मेलचे १८ डबे रुळावरून घसरले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर इतर २० जण जखमी झाले. दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात जमशेदपूरपासून ८० कि.मी.वर असलेल्या बाराबांबूजवळ पहाटे पावणेचार वाजता हा अपघात झाला.
या मेलने उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. त्यानंतर ती रुळावरून घसरली, असे प.सिंगभूमचे उपायुक्त कुलदीप चौधरी यांनी सांगितले. झारखंडमधील प.सिंगभूम आणि सरायकेला-खरसावां जिल्ह्यांच्या सीमेवर हा अपघात झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
दक्षिण-पूर्व रेल्वेचे प्रवक्ते ओमप्रकाश चरण यांनी सांगितले, की हावडा-मुंबई मेलच्या एकूण २२ डब्यांपैकी १८ डबे रुळावरून घसरले. त्यापैकी १६ डबे प्रवासी असून प्रत्येकी एका वीजपुरवठा करणाऱ्या व भोजन बनविणाऱ्या डब्याचाही यात समावेश आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी घटनास्थळी तत्काळ मदत व बचावकार्य राबविण्याचे आदेश दिले.
अपघातातील जखमींवर बाराबांबूत प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना चक्रधरपूरला हलविण्यात आले आहे. रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. किरकोळ जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येतील. अपघातातील मदत व बचाव कार्य पूर्ण झाले असून ८० टक्के प्रवाशांना चक्रधरपूर रेल्वे स्थानकावर पाठविण्यात आले आहे. उर्वरित २० टक्के प्रवाशांनाही विशेष रेल्वेने पाठविण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या अपघातामुळे काही एक्सप्रेस व पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.