पुण्यात शिकणारा विद्यार्थी पाहतोय 'अफगाण'चा राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न

पुण्यात शिकणारा विद्यार्थी पाहतोय 'अफगाण'चा राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न
Updated on

पुणे: अफगाणिस्तानातून पुण्यात शिकायला अनेक अफगाणी विद्यार्थी आलेले आहेत. पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमध्ये राज्यशास्त्राच्या अंतिम वर्षाला अभ्यास करणाऱ्या वली रहमान रहमाणी याची मुलाखत घेतलीय विनायक होगाडे यांनी...

1. तू सध्या काय शिकतोय?

मी सध्या पुण्यात राज्यशास्त्राचा अभ्यास करतो आहे. फर्ग्यूसन कॉलेजमध्ये मी अंतिम वर्षाला आहे. सध्या ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत, मात्र मी इथेच आहे.

2. तुझं कुटुंब कसं आहे? ते सगळे व्यवस्थित आहेत ना?

हो. माझं कुटुंब अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये राहतं. ते सगळे व्यवस्थित आहेत. मी कालच त्यांच्याशी बोललो. मी बदललेल्या परिस्थितीबाबत हास्यविनोदाने कालच माझ्या लहान भावासोबत बोललो. मी विचारलं की, तुझी काय मनस्थिती आहे? तू घाबरला आहेस का? तो म्हणाला की, तालिबानला सोड, जरी आयएसआय, पाकिस्तान जरी आलं तरी काही करु शकणार नाहीत, असं त्याने गंमतीने म्हटलं.

3. काय घडतंय सध्या अफगाणिस्तानमध्ये? काय सांगशील?

गेल्या ४० वर्षांतल्या या सगळ्या घडामोडी आहेत. विशेषत: 9/11 च्या घटनेनंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आक्रमण केलं. त्यानंतर आर्मी, तालिबान आणि अमेरिकेची आर्मी यांच्या सततच्या संघर्षात जवळपास १० लाख अफगाणी लोक मारले गेलेत. गेल्या एका दशकात ४० हजारहून अधिक बॉम्ब्स डागले गेलेत. गेल्या कित्येक वर्षांत अफगाणी लोक चांगल्या स्थितीत नाहीयेत. मानवाधिकार, महिलांचे अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे उपलब्ध असलं तरीही सततच्या असुरक्षिततेमुळे यातलं काहीच नीटपणे अफगाणी लोकांना प्राप्त करता आलं नाहीये. आता तालिबानने ताबा घेतलाय, आता बघू काय वाटाघाटी घडतायत ते...

पुण्यात शिकणारा विद्यार्थी पाहतोय 'अफगाण'चा राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न
अफगाणिस्तानबाबत अमेरिकेची काय भूमिका आहे; पाहा व्हिडिओ

4. या सगळ्या परिस्थितीवर तुझं काय मत आहे?

प्रत्येकजणच सध्या अफगाणिस्तान देशाबद्दल आणि देशाच्या भविष्याबद्दल चिंताग्रस्त आहे, आणि असलं सुद्धा पाहिजे. तरुण पिढीचं तसेच येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याबाबतची ही चिंता आहे. सध्या आमच्या देशाच्या सत्तेवर चांगलं शासन असावं असं वाटतं. पण दुर्दैवाने आता ताबा घेतलेल्या तालिबानमध्ये सुशिक्षित लोक नाहीयेत. देशातले जे सुशिक्षित लोक आहेत, त्यांनी आताच्या परिस्थितीत तर देशाबाहेर पलायन केलंय. तर आम्हाला प्रशासनामध्ये तरुण आणि सुशिक्षित लोक हवे आहेत. अन्यथा, कुणालाच प्रशासन न चालवता आल्याने सतत संकटंच समोर येत राहतील. मानवी अधिकार, महिलांचे अधिकार याबाबत तालिबान कितपत चांगलं प्रशासन चालवेल, याबाबत मोठी साशंकता आहे.

5. तुझ्या काय भावना आहेत?

मी स्वत: आता २२ वर्षांचा आहे. तालिबानच्या मागच्या शासनकाळात म्हणजे १९९९ मध्ये मी जन्माला आलो आणि आता देखील आम्ही इथेच आहोत. जन्माला आल्याच्या पहिल्यादिवशी मी बंदूकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकलेत आणि आता सुद्धा मी तेच ऐकत आहे. एक तरुण म्हणून मला शांतता हवीय. कारण आम्ही सुद्धा माणसं आहोत.

6. देशाच्या सध्याच्या परिस्थितीला सगळ्यात जास्त कोण जबाबदार आहे, असं तुला वाटतं? तालिबान की अमेरिका?

निश्चितपणे अमेरिकाच जबाबदार आहे. एकही अफगाणी याला जबाबदार नाहीये. त्यांनी या परिस्थितीत अफगाण्यांना ढकललं आहे. कसल्याही गॅरंटीशिवाय त्यांनी तालिबानसोबत समझोता केला आणि माघार घेतली. खरंतर अमेरिकेला हेच अपेक्षित आहे. जे अफगाण आर्मीत आहेत तेही अफगाणी आहेत आणि जे तालिबानमध्ये आहेत, तेही अफगाणीच आहेत. अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये शांतता नव्हे तर फक्त संघर्ष हवाय. मदतीच्या नावाखाली त्यांनी आमच्या कित्येक लोकांना मारलंय. आम्हाला याप्रकारणी सहानुभूती आता पुन्हा नकोय. त्यांची सहानुभूती, त्यांचा पाठिंबा खोटा आहे. रशिया, चीन, पाकिस्तान कुणीच आमच्यात आता हस्तक्षेप करु नये, असं मला वाटतं.

पुण्यात शिकणारा विद्यार्थी पाहतोय 'अफगाण'चा राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न
अफगाणिस्तान दहशतवादाचा अड्डा होणार नाही; चीनला तालिबानकडून अपेक्षा

7. पण, मग सध्याच्या परिस्थितीला तालिबान काहीच जबाबदार नाही का?

निश्चितपणे ते असणारच आहेत. आता इथून पुढे अफगाणिस्तानमध्ये जे घडेल त्याला फक्त तेच जबाबदार असतील. पण त्यांच्या या गोंधळासाठी जमीन कुणी बनवून दिली? अमेरिकेच्या राजकारणामुळेच आजची परिस्थिती उद्भवली आहे. मात्र, आता इथून पुढे जे घडेल त्याला फक्त तालिबानच जबाबदार राहील. तालिबान सरकार राबवण्यात यशस्वी होईल, असं मला वाटत नाही. कारण तालिबानला देशातील प्रत्येक गटाशी, समुहाशी संवाद करावा लागेल. इतकंच नव्हे तर देशाबाहेरसुद्धा चांगले नातेसंबंध तयार करावे लागतील. माझ्यामते, देशाबाहेरील अथवा देशातील कोणतीच शक्ती देशाला याप्रकारे कंट्रोल करता कामा नये, ज्यातून अशी अनागोंदी माजेल.. मात्र, पाहूयात की पुढे काय घडतंय...

8. तालिबान अफगाणिस्तानात शासन चालवण्यास सक्षम आहे, असं तुला वाटतंय का?

नाही, सध्या तरी तसं वाटत नाही. कारण, त्यांच्याकडे साधारण ८० हजार लोक आहेत. हे लोक फार सुशिक्षित सुद्धा नाहीयेत. तसेच ते फार तंत्रज्ञानस्नेही देखील नाहीयेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे कठीण असणार आहे.

9. तालिबानच्या शासनात महिलांचं काय स्थान असेल असं तुला वाटतं?

आम्ही महिलांबाबत चिंतेत आहोत. 'डेमोक्रॅटीक ऑफ अफगाणिस्तान' किंवा 'रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान' असेल तर काहीतरी चांगलं घडू शकतं. मात्र, तसं नाहीये सध्या. तरीही आम्ही सध्या आशा ठेवून आहोत की महिलांना त्यांचे अधिकार मिळतील. कारण अफगाणी महिला या धाडसी आहेत. त्या पलायन करत नाहीत. मात्र, त्यांच्या अधिकारासाठी आम्ही लढू.

10. तालिबानबद्दल तुझं काय मत आहे? तू समर्थन करतोस का?

जे अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय हिताच्या बाजूने आहेत, मी त्यांना समर्थन देतो. तालिबान गेल्या काही वर्षांपासून देशाच्या हितासाठी काम करत नाहीये. त्यामुळे, आतापर्यंत, ते माझ्यासाठी तरी दहशतवादी आहेत. मी माझा भाऊ सैन्यामध्ये असताना त्यांच्यामुळे गमावला आहे. जर त्यांनी अफगाणिस्तानच्या हितासाठी काही चांगलं काम केलं तर मी माझं मत बदलायला तयार असेन, मात्र, जर त्यांनी तोच मागचा कित्ता पुन्हा गिरवला तर मी माझ्या देशातील लोकांसोबत त्यांच्याविरोधात उभा राहिन. मात्र, ही वेळ येण्यापेक्षा अफगाणिस्तानातील युद्ध थांबावं, अशी मी आशा करतोय.

पुण्यात शिकणारा विद्यार्थी पाहतोय 'अफगाण'चा राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न
उझबेकिस्तानने अफगाणिस्तानचं जेट विमान पाडलं, ४६ विमानांचं जबरदस्ती लँडिंग

11. तू मोठी स्वप्नं घेऊन इथे भारतात, पुण्यात आला असशील, मात्र, आता तू स्वत:चं भविष्य काय पाहतोयस?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मी कधीही हार मानणार नाही. मला राज्यशास्त्राचा अभ्यास करुन एक राजकारणी बनायचं आहे. आणि एक दिवस मला अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनायचं आहे. हेच माझं ध्येय आहे. सध्या काही अडचणी आहेत. अंधार आहे, मात्र, मला आशा आहे, मी हार मानणार नाही. मला कसं ते माहिती नाही. पण मी त्याच्याविरोधात उभा राहीन.

12. भारताबद्दल काय सांगशील?

भारताकडे पहायचं झालं तर इथे अनेक जातींचे समूह आहेत. कित्येक धर्म आहेत. मात्र, तरीही भारत एकजूट आहे. तिकडे अफगाणिस्तानमध्ये ९९ टक्के लोक इस्लामी आहेत, तरीही आम्ही एकजूट नाहीयोत. भारतात कित्येक भाषा बोलल्या जातात. आमच्या इथे फक्त दोनच भाषा आहेत, पश्तो आणि फारसी... आमच्या इथे दोन-चार जातीचे गट आहेत, तरीही आम्ही अनागोंदीत आहोत.

13. सरतेशेवटी काय सांगशील?

इराण, पाकिस्तान, भारत, बांग्लादेश कुणीही आमचं सध्या मित्र नाहीये. मध्य आशियात आम्ही सध्या एकटे पडलो आहोत. इराणलाही आमच्या देशात शांतता नकोय. मात्र, आता आम्हाला तरुणांना ही खेळी कळली आहे, आम्ही इतिहासातून शिकू. आम्हालाही शांतताप्रिय देश बनायचं आहे, एक मजबूत देश बनायचं आहे. कितीही संकटं आली तरी आम्हाला त्यांना भिडायचं आहे. बघूयात, आपण आता मानवी जगासाठी काय करु शकतो. दुर्दैवाने, २० वर्षे युद्ध सुरुये. त्याआधी ब्रिटीशकाळापासून हेच सुरुये. मात्र, आम्ही पुन्हा यातून नक्कीच बाहेर पडू. युद्धातून काहीच साध्य होणार नाहीये. आम्हालाही शांतता आणि सौहार्द हवा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.