सेव्हिल (स्पेन) : एअरबस डिफेन्स अँड स्पेस या कंपनीने आज ‘सी-२९५’ हे मालवाहू विमान भारतीय हवाई दलाच्या ताब्यात दिले. याबरोबरच, करारानुसार एकूण ५६ ‘सी-२९५’ विमाने भारताला मिळण्यास सुरुवात झाली आहे. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी एअरबसच्या स्पेनमधील सेव्हिली येथील निर्मिती केंद्रावर जाऊन हे विमान स्वीकारले.
भारतीय हवाई दल अधिक सुसज्ज करण्यासाठी एअरबस कंपनीबरोबर दोन वर्षांपूर्वी झालेल्या २१ हजार ९३५ कोटी रुपयांच्या करारानुसार भारताला एकूण ५६ ‘सी-२९५’ विमाने मिळणार आहेत. पुढील दोन वर्षांत त्यापैकी १६ विमाने ही तयार अवस्थेत मिळणार आहेत. त्यानंतरची ४० विमाने ही टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स (टीएएसएल) या कंपनीद्वारे भारतात उत्पादित केली जाणार आहेत.
‘टीएएसएल’ आणि ‘एअरबस’ यांच्यात झालेल्या औद्योगिक भागीदारीनुसार हे उत्पादन केले जाणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोदा येथे ‘सी-२९५’ विमानांची निर्मिती करणाऱ्या केंद्राचे भूमिपूजन केले होते. भारतात प्रथमच एक खासगी कंपनी भारतीय हवाई दलासाठी विमान तयार करणार आहे. हवाई दलाकडील एव्हरो-७४८ ही मालवाहू विमाने सहा दशकांपूर्वी सेवेत दाखल झाली होती. त्यांची जागा ही नवी विमाने घेणार आहेत.
वैमानिकांना प्रशिक्षण
भारतासाठी बनविलेल्या पहिल्या सी-२९५ विमानाची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे. दुसरे विमानही तयार होण्याच्या टप्प्यावर असून पुढील वर्षी मे महिन्यात ते भारतीय हवाई दलाला मिळेल. हवाई दलाचे सहा वैमानिक आणि २० तंत्रज्ञांना सेव्हिली येथे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. बडोदा येथील निर्मिती केंद्रही पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत सुरु होणार आहे.
सी-२९५ ची वैशिष्ट्ये
दुर्गम ठिकाणीही सैनिकांना नेण्याची क्षमता
एका वेळी ७१ सैनिकांना त्यांच्या सामानासह नेता येणार
हवेतूनच सैनिकांना पॅराशूटद्वारे खाली सोडण्याची सोय
आपत्कालीन परिस्थितीत बचाव मोहीम राबविण्यासाठी उपयुक्त
समुद्रावर गस्तही घालण्यास उपयोगी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.