महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेनं वरती आणलं. आम्ही ठरवलंच असतं तर देशात सेनेचा पंतप्रधान असता असंही राऊंतांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं.
नवी दिल्ली - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेनं वरती आणलं. आम्ही ठरवलंच असतं तर देशात सेनेचा पंतप्रधान असता असंही राऊंतांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही युतीचा धर्म नेहमीच पाळला आहे. इतिहास याला साक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी काल व्यक्त केलेली खंत योग्यच आहे. भाजपसोबत गेलेल्या प्रत्येक पक्षाला सेनेसारखीच वागणूक दिली गेली. फक्त शिवसेनेचीच ही गोष्ट नाही. ज्यांना चांगला उद्देश ठेवून भाजपसोबत जायचा निर्णय घेतला त्यांची हीच अवस्था झालीय. अकाली दल, गोव्यात एमजीपी, हरयाणातसुद्धा असंच झालं. चंद्राबाबू नायडू, जयललिता यांना किंमत मोजावी लागली. मात्र एकमेव शिवसेना असा पक्षा आहे ज्यांनी भाजपला किंमत मोजावी लागेल असं काम केलंय.
बाबरी प्रकरणानंतर उत्तर भारतात शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरेंची लाट होती. तेव्हा आम्ही उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, पंजाब, काश्मीरमध्ये निवडणूक लढलो असतो तर देशात आमचाच पंतप्रधान असता. पण आम्ही हे सगळं भाजपसाठी सोडलं. तुम्ही देशात आणि आम्ही महाराष्ट्रात काम करू असं बाळासाहेबांचं धोरण होतं. त्यांचा हा मोठेपणा होतं आणि ते खरे हिंदूहृदयसम्राट होते असंही राऊतांनी म्हटलं.
संजय राऊत म्हणाले की, एखादा हिंदू पक्ष देशात वाढवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही त्यात अडथळा आणणार नाही अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती. आम्ही एका विचारसरणीचे असून तुम्ही मोठे असा किंवा लहान, विचार वाढत राहिला पाहिजे असंच त्यांचं म्हणणं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.