नवी दिल्ली : नव्या वर्षात राज्यसभेचे ६८ खासदार निवृत्त होणार असून त्यात नऊ केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या प्रमुख नेत्यांना भाजप भविष्यात कशापद्धतीने सामावून घेणार, याकडे सर्वांले लक्ष आहे.
राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत असलेल्या मंत्र्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान, नारायण राणे, अश्विनी वैष्णव, हरदीप सिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला, राजीव चंद्रशेखर अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
या वर्षी रिक्त होत असलेल्या ६८ पैकी तीन जागांसाठी लवकरच मतदान होणार आहे. आप नेते संजय सिंह, नरेनदास गुप्ता आणि सुशीलकुमार गुप्ता हे निवृत्त होत असल्याने ही निवडणूक घेतली जाईल.
याशिवाय सिक्कीममधील ‘एसडीएफ’चे खासदार हॅशले लाच्छुंप्पा हे फेब्रुवारी महिन्यात निवृत्त होत असल्याने या जागेसाठीही निवडणूक होणार आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक ५७ सदस्य राज्यसभेतून निवृत्त होतील. यात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, धर्मेद्र प्रधान, मनसुख मंडाविया तसेच माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा समावेश आहे.
एप्रिल महिन्यात रिक्त असलेल्या ५७ पैकी सर्वाधिक १० जागा उत्तर प्रदेशातल्या आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी सहा जागा असून मध्य प्रदेश आणि प. बंगालमधील प्रत्येकी पाच जागांचा समावेश आहे.
कर्नाटक आणि गुजरातमधील प्रत्येकी चार जागा रिकाम्या होत असून ओडिशा, तेलंगण, केरळ आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी तीन जागा रिक्त होणार आहेत. याशिवाय झारखंड आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाना आणि छत्तीसगड या राज्यांतील प्रत्येकी एक जागा रिकामी होणार आहे.
जुलै महिन्यात राष्ट्रपती नियुक्त चार जागा रिक्त होतील. यावर्षी निवृत्त होणाऱ्या प्रमुख नेत्यांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशात भाजप आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने नड्डा यांना वरिष्ठ सभागृहात पाठविण्यासाठी भाजपला अन्य राज्याचा पर्याय शोधावा लागेल.
यंदा निवृत्त होत असलेल्या अन्य प्रमुख नेत्यांत बिजू जनता दलाचे प्रशांत नंदा, अमर पटनाईक, भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेसचे नरेन भाई राठवा, अमी याज्ञिक, कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी, राजदचे मनोज झा, भाजपचे सुशीलकुमार मोदी, सरोज पांडे, जीव्हीएल नरसिंहा राव, एल. मुरुगन, सुधांशू त्रिवेदी, सपाच्या जया बच्चन आदी सदस्यांचा कार्यकाळ देखील या वर्षी संपणार आहे. राष्ट्रपती नियुक्त जे चार सदस्य जुलैमध्ये निवृत्त होणार आहेत, त्यात महेश जेठमलानी, सोनल मानसिंह, राम साकाल आणि राकेश सिन्हा यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.