नवी दिल्ली - देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरदिवशी कोरोनाची रुग्णसंख्या उच्चांक गाठत आहे. यामुळे रुग्णालयांमध्ये बेड कमी पडत असून रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यात बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर अभावी रुग्णांचे प्राणही जात आहेत. बुधवारी पुन्हा एकदा देशात नवीन रुग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठला. दिवसभरात तब्बल 3 लाख 79 हजार 257 रुग्ण सापडले तर मृतांची संख्याही वाढली. गेल्या 24 तासात 3645 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगानं कोरोनामुक्तांची संख्याही वाढत आहे. बुधवारी एका दिवसात 2 लाख 69 हजार 507 रुग्ण बरे झाले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. आतापर्यंत 28 कोटी 44 लाख 71 हजार 979 चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी एका दिवसात 17 लाख 68 हजार 190 जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.
महाराष्ट्रात 63 हजार नवीन रुग्ण
महाराष्ट्रात बुधवारी 63 हजार 309 लोकांना कोरोनाची लागण झाली, तर 985 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात 44 लाख 73 हजार 394 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 61 हजार 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 6 लाख 73 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत.
दिल्लीत कोरोनाचा कहर
देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात 25 हजार 986 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 368 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत सक्रीय रुग्णांची संख्या 99 हजार 752 इथकी आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 20 हजार 458 जण कोरोनामुक्त झाले. सध्या दिल्लीत 53 हजार 819 रुग्ण होम क्वारंटाइन आहेत.
दीडशे जिल्ह्यात निर्बंध शक्य
देशात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातमध्ये लॉकडाउन सुरू असल्याने रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमध्ये मर्यादित सवलतींसह निर्बंध लागू करण्याचा विचार केला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पंधरा टक्क्यांहून अधिक आहे, अशा दीडशे जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात.
जगभरातून मदतीचा ओघ
भारतातील कोरोना वाढीचा वेग आणि देशातील परिस्थिती पाहून संयुक्त राष्ट्रानेसुद्धा मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. संयुक्ता राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, WHO आणि UNICEF च्या सहकार्याने कोरोनाला रोखण्यासाठी 7 हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, 500 नोजल डिव्हाइससह ऑक्सिजन तयार करणारी झाडेही पाठवली जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती भयावह अशी असून जागतिक आरोग्य संघटना महाराष्ट्रात मोबाइल हॉस्पिटल युनिट, लॅब आणि 2600 फिल्ड ऑफिसर पाठवणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.