नवी दिल्ली- भारत १०० व्या स्वातंत्र्यदिनी एक विकसित आणि प्रगत राष्ट्र असेल. तसेच देशात भ्रष्टाचार, जातीवाद, जमातवाद याला कोणतीही जागा नसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. न्यूज एजेन्सी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारत देश २०४७ मध्ये विकसीत देश असेल, असं मोदी मुलाखतीमध्ये म्हणाले. (India will be a developed nation when it celebrates 100 years of Independence)
भारतात ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये जी-२० ची शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी याविषयी भाष्य केलं. जग भारताला मार्गदर्शकाच्या रुपात पाहात आहे. आपले शब्द आणि ध्येय जगाकडून भविष्यातील दिशादर्शकाच्या स्वरुपात पाहिले जात आहेत. आता या केवळ कल्पना राहिलेल्या नाहीत. जगाला आपल्याकडून आशा आहेत, असं मोदी म्हणाले.
जगाचा जीडीपी केंद्रीत दृष्टीकोण आता मनुष्य केंद्रीत होत आहे. भारत देश यामध्ये महत्त्वाचीआणि मध्यस्त म्हणून भूमिका पार पाडत आहे. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला असल्याचं मोदी म्हणाले. खूप काळ भारताकडे एक अब्ज उपाशी पोटांचा देश म्हणून पाहिलं जात होतं. पण, आता एक अब्ज महत्वाकांक्षी बुद्धीवानांचा आणि दोन अब्ज कौशल्यपूर्ण हातांचा देश म्हणून पाहिलं जात आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया-युक्रेन युद्धाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. दोन देशातील संघर्ष चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर सोडवला जाऊ शकतो याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला. भारत सरकारने दोन देशांच्या युद्धामध्ये स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने टीकाही झाली आहे.
जी-२० चे भारताला मिळालेले अध्यक्षपद नक्कीच मोठा प्रभाव टाकणारे आहे, असं मोदी म्हणाले. अनेक चांगले प्रभावी बदल जी-२० च्या अध्यक्ष पदामुळे निर्माण झाले आहेत आणि यातील काही माझ्या हृदयाच्या खूप जवळचे आहेत. भारताच्या नेतृत्वामुळे जी-२० केवळ संकल्पाचे व्यासपीठ राहिले नसून भविष्यातील दिशादर्शक ठरले आहे. जागतिक सहयोगासाठी भारताचे प्रयत्न असल्याचं मोदी म्हणाले.
भारत एका मोठ्या बदलातून जात आहे. सबका साथ, सबका विकास हे धोरण कायम आहे. ही संकल्पना जगासाठीही मार्गदर्शक असेल. भारताला सध्या विकासाची मोठी संधी असून ते साध्य केल्यास हजारो वर्षांपर्यंत लक्षात ठेवले जाईल. देश लवकरच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर जाईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. भारताने एका दशकात पाच स्थानांनी प्रगती केली आहे. त्यामुळे भारताचा विकास कोणीही नाकारु शकत नाही. भारत जगातील सर्वाधिक गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असंही ते म्हणाले.
जम्मू-काश्मिरमध्ये आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जी-२० परिषद ठेवण्यावरुन पाकिस्तान आणि चीनने नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना मोदी म्हणाले की, भारताच्या कोणत्याही भूमिवर परिषद घेणे नैसर्गिक आहे. यात कोणालाही आक्षेप असता कामा नये.
सायबर गुन्हेगारी वाढली असून युद्धाचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे. वित्तीय घडामोडींवर हल्ला दहशतवादी करत आहेत. दहशतवादी डार्कनेट, मेटावर्स, क्रिप्टोकरन्सी सारखे टूल वापरत आहेत. अशा प्रकारच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचं मोदी म्हणाले.
भारत २०७० मध्ये नेट झिरो लक्ष्य गाठेल. भारत येत्या काळात ग्रीन एनर्जीकडे वळेल, पण भारतातील हा बदल इतर देशांपेक्षा वेगळा असेल असं मोदींनी नमूद केलं. विसाव्या शतकातील दृष्टीकोणातून आपण एकविसाव्या शतकात तग धरु शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आमुलाग्र बदल आवश्यक असल्याचं ते म्हणाले. येत्या काळात प्रांतिक संस्थाचे महत्व वाढेल असंही मोदी म्हणाले.
डेमोक्रेसी, डेमोग्रॅफी, डायवरसिटी आणि डेव्हलपमेंट हे डी भारताचे शक्तीस्थान आहेत. निसर्ग आणि संस्कृतीचे रक्षण करुन लोकांच्या जीवनात मूल्यात्मक बदल करण्यास आपण बांधिल असल्याचं मोदी म्हणाले. २०४७ कडे वाटचाल करताना लोकांचे जीवनमान आणि निसर्ग-संस्कृती यांचे संतुलन ठेवले जाईल, असा विश्वास मोदींनी दिला.
देशाने नऊ वर्षात अनेक महत्वाच्या सुधारणा केल्या आहेत. बेजाबदार वित्तीय सुधारणांमुळे कमी काळात राजकीय फायदा मिळतो. पण, त्याचे दूरगामी वाईट परिणाम पडतात. गरीब आणि असुरक्षित लोकांना याचा सर्वाधित फटका बसतो, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईबाबतही भाष्य केलं. जगभरात महागाई वाढत आहे. याबाबत जी-२० परिषदेमध्ये नेत्यांची चर्चा केली जाणार आहे. एका देशातील महागाई दुसऱ्या देशावर परिणाम करणारी अशी योजना आखण्याबाबत चर्चा केली जाईल, असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.