जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज गोळ्या झाडण्यात आल्या. माजी पंतप्रधान अबे यांची प्रकृती चिंताजनक आहे.
नवी दिल्ली : जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर आज गोळ्या झाडण्यात आल्या. माजी पंतप्रधान अबे यांची प्रकृती चिंताजनक आहे. आपल्या खास मित्रावर झालेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदींनीही (Narendra Modi) शोक व्यक्त केलाय. आबे कुटुंबाचं नातं देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यापासून सुरू झालं आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत टिकलं.
शिंजो आबे हे 1957 मध्ये स्वतंत्र भारताला भेट देणारे पहिले जपानी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे नातू आहेत. आबे यांचा भारताशी संबंध बालपणापासून होता. भारत भेटीदरम्यान आबे यांनी लहानपणी भारताबद्दल ऐकलेल्या कथा त्यांच्या आजोबांच्या मांडीवर बसून ऐकल्याचं ते सांगतात. शिंजो आबे यांचं भारताशी विशेष आकर्षण होतं. भारताची संस्कृती आणि द्विपक्षीय संबंधांबद्दल आबे यांची जवळीक अनेक प्रसंगी दिसून आली. बुलेट ट्रेन प्रकल्पापासून नागरी आण्विक करारापर्यंत आबे यांची भूमिका भारतावरील त्यांचं प्रेम दर्शवते.
शिंजो आबे यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 2006-2007 मध्ये भारताला भेट दिली होती. त्या दौऱ्यात त्यांनी संसदेत भाषणही केलं. भारताला सर्वाधिक वेळा भेट देणारे ते जपानचे पंतप्रधान होते. शिंजो आबे यांनी जानेवारी 2014, डिसेंबर 2015 आणि सप्टेंबर 2017 मध्ये पंतप्रधान म्हणून भारताला भेट दिली. 2014 मध्ये आबे हे पहिले जपानी पंतप्रधान होते, ज्यांना भारतानं प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी यांच्याशी घट्ट स्नेह आहे. वाराणसीच्या विकासात मोठी भूमिका बजावणारे शिंजो आबे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत वाराणसीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मोदींसोबत गंगा आरतीही केली. वाराणसी भेटीपासून भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना मजबूत राजनैतिक आधार मिळालाय. शिंजो आबे हे देखील पंतप्रधान मोदींना आपले प्रिय मित्र मानतात. आबे यांनी वाराणसीच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना जवळून पाहिलंय. शिंजो आबे हे पंतप्रधान मोदींचे खास मित्र आहेत. जेव्हा-जेव्हा हे दोन मुत्सद्दी दीर्घकाळ भेटतात, तेव्हा अनेकांना त्यांच्या मैत्रिची खात्री पटते. शिंजो आबे पंतप्रधान म्हणून भारतात आले, तेव्हा मोदींनी त्यांना वाराणसी दर्शनासाठी नेलं होतं. यावेळी दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी एकत्र गंगा आरती केलीय.
2020 मध्ये शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत राजीनामा देण्याची घोषणा केली. पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आबे यांनी पंतप्रधान मोदींसोबतची भेट आठवली. त्यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर अर्धा तास चर्चा केली. यावेळी त्यांनी 'मैत्री आणि विश्वासाच्या' नात्याबद्दल पंतप्रधान मोदींचं आभार मानलं होतं. यावर पीएम मोदींनीही आबे यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं.
2001 मध्ये भारत आणि जपान यांच्यात जागतिक भागीदारीचा पाया घातला गेला. 2005 मध्ये दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय शिखर परिषदेवर सहमती झाली होती. 2006 मध्ये पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 'इंडिया जपान स्ट्रॅटेजिक अॅण्ड ग्लोबल पार्टनरशिप'वर स्वाक्षरी केली. त्यानंतर 2007 मध्ये आबे आणि सिंग यांनी 'भारत-जपान यांच्यातील धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीसाठी नवीन आयामांचा रोडमॅप आणि 'पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा सुरक्षेवर वाढणारे सहकार्य' यावरही स्वाक्षरी केली. ऑगस्ट 2007 मध्ये भारताच्या तीन दिवसीय भेटीदरम्यान भारत आणि जपाननं मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंधांच्या दीर्घ इतिहासावर नवीन द्विपक्षीय आशियाई आघाडीवर सहमती दर्शवली.
आबे यांच्या नेतृत्वाखाली भारतासोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्याचा क्वाड मसुदा, इंडो-पॅसिफिकवरील अमेरिका, भारत आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांसोबतचे सहकार्य हे अतिशय महत्त्वाचे होते. भारत-जपान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) ऑगस्ट 2011 मध्ये लागू झाला. भारतानं केलेल्या अशा सर्व करारांपैकी हा पहिला करार होता. भारत आणि जपानमध्ये व्यापार होणाऱ्या ९४ टक्क्यांहून अधिक वस्तूंवरील शुल्क काढून टाकणं हा त्याचा उद्देश होता.
शिंजो आबे यांच्या कारकिर्दीत जपान आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय धोरणात्मक संबंध खूप दृढ झाले होते. भारत आणि जपान यांच्यातील नागरी अणू करार हा या दिशेनं एक महत्त्वाचा उपक्रम होता. या करारानं अणू पुरवठा गटातील देशांना प्रवेश मिळण्यातील भारताचे अडथळे दूर केले, ज्यामुळं भारताला त्याच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी सुलभ प्रवेशाचे दरवाजे खुले झाले. 2020 मध्ये भारत आणि जपान यांच्यात संरक्षण प्रकरणांमध्ये पुरवठा आणि सेवांच्या परस्पर तरतूदीवरील करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळं दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये परस्पर सहकार्याचा मार्ग खुला झाला आणि गरजेच्या वेळी एकमेकांमध्ये पुरवठा आणि सेवांची सुरळीत देवाण-घेवाण झाली.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे असो, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असो किंवा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असो जपानच्या सहकार्यानं उभारलं जाणारं हे प्रकल्प नव्या भारताची ताकद बनणार आहे. शिंजो आबे यांच्या कार्यकाळात या करारांना गती मिळाली. पंतप्रधान म्हणून शिंजो आबे यांच्या पुढाकारानं भारतात बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला. बुलेट ट्रेनबाबत भारताचा जपानसोबतचा करार दोन्ही देशांमधील संबंधांना नव्या उंचीचे प्रतीक होता. बुलेट ट्रेन प्रकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नातील महत्त्वाचा भाग आहे. शिंजो आबे यांनी हा प्रकल्प साकारण्यासाठी केलेला करार अतिशय महत्त्वाचा होता.
गेल्या वर्षी भारतानं जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण बहाल करण्याचा निर्णय घेतला होता. जनसेवेच्या क्षेत्रात त्यांना हा सन्मान देण्यात आला. 2001 मध्ये जपानचे संरक्षण मंत्री होसोई नोरोटा यांना हा सन्मान मिळाल्यानंतर आबे हे दुसरे जपानी राजकारणी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.