बंगळूर - ‘अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ भारतीय अंतराळवीरांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देणार आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी आज येथे ही घोषणा केली. उभय देशांच्या सर्वोच्च नेतृत्वाने या सहकार्यावर आधीच शिक्कामोर्तब केले होते. आता दोन्ही देश त्या दिशेने पावले टाकतील.
गार्सेटी यांनी भारत आणि अमेरिका यांच्या भागिदारीतून ‘क्वाड’ उपग्रहाच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला आहे. गार्सेटी यांनी बंगळूर भेटीमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) मुख्यालयास भेट दिली तसेच ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्यासोबत द्विपक्षीय भागिदारीबाबत चर्चा केली.
‘इस्रो’च्या अध्यक्षांनी यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान, पॅकेजिंग तंत्रज्ञानाच्या विकासाचा आग्रह धरला. यासाठी दोन्ही देशांतील शैक्षणिक संस्था एकत्र येऊन काम करू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राला आता अमेरिकेची मदत मिळणार असून नासा भारतीय अंतराळवीरांना अत्याधुनिक प्रशिक्षण देईल. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर दोन्ही देश संयुक्तपणे काम करतील असे गार्सेट्टी यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले.
‘भारत- अमेरिका व्यावसायिक अंतराळ परिषद - अवकाश स्टार्टअपसाठीच्या नव्या संधींचा शोध’ या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. ‘भारत- अमेरिका उद्योग परिषद’ आणि ‘अमेरिकी व्यावसायिक सेवा’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
याआधी द्विपक्षीय सहकार्य करार करणाऱ्या भारतीय आणि अमेरिकी नेत्यांना मनापासून सलाम करायला हवा. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य वाढत चालले आहे. ही प्रगती पाहून मला आनंदच झाला आहे.
- एस सोमनाथ, ‘इस्रो’चे अध्यक्ष
स्टार्टअपच्या विकासासाठी प्रयत्न
‘या वर्षामध्ये किंवा पुढील वर्षी नासा भारतीय अंतराळवीरांना अत्याधुनिक प्रशिक्षण देईल. दोन्ही देश मिळून लवकरच ‘एनआयएसएआर’ या उपग्रहाचे सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करतील. हा उपग्रह पृथ्वीचा पृष्ठभाग, नैसर्गिक संकटे, समुद्राची पाणी पातळी आणि अन्य घटकांचे निरीक्षण करेल,’ असे गार्सेटी यांनी नमूद केले.
आजचा दिवस हा दोन्ही देशांच्या अवकाश कार्यक्रमाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही देश मिळून या क्षेत्रामध्ये स्टार्टअपची निर्मिती करू शकतात. यामुळे अमेरिकी आणि भारतीय नागरिकांना चांगल्या वेतनाचा रोजगार मिळू शकेल. या सगळ्या बदलांसाठी अवकाश ही एक उत्तम जागा आहे, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.