नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना भाजपचे ‘शत प्रतिशत' व अचूक मतदान व्हावे यासाठी भाजप नेतृत्वाने कंबर कसली आहे. येत्या शनिवारी (ता.१६) भाजपर्या लोकसभा-राज्यसभा खासदारांसाठी दिल्लीत ‘डिनर' आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱया या मेजवानीच्या निमितताने दोन्ही सदनांतील भाजप खासदारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान कसे करावे याबाबत विस्ताराने मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देण्यात येईल. ही निवडणूक व आगामी संसदीय अधिवेशन याबाबत स्वतः मोदी यांचे संबोधन हा या बैठकीच्या उत्सुकतेचा विषय आहे. (President Election 2022)
राष्ट्रपतीपदासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (१८ जुलै) राजधानी दिल्लीसह राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत मतदान होणार आहे. भाजपने उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर करताच चित्र बदलल्याने श्रीमती मुर्मू यांचा विजय दृष्टीपथात आला असल्याचे चित्र आहे. मुर्मू यांच्या देशव्यापी दौऱयाच्या प्रत्येक टप्प्यागणिक राज्याराज्यांतून त्यांनावाढता पाठिंबा मिळत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मात्र भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्वाची कोणतीही रिस्क घेण्याची तयारी नाही. त्यादृष्टीने देशभरातील भाजप आमदार, खासदारंसाठी निवडणुकीच्या मतदानाबाबत असेच प्रशिक्षण वर्ग घेण्याच्या सूचना भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिलेल्या आहेत.
दरम्यान संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधानांसह प्रमुख भाजप नेते भाजप खासदारांसाठी आयोजित केलेल्या डिनरसाठी संसदीय ग्रंथालयातील बालयोगी सभागृहात पोहोचतील. भाजप खासदारांनी शनिवारी सायंकाळी ५ पर्यंत दिल्लीत पोहोचावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील तज्ज्ञ राष्ट्रपतीपदाच्या मतदानाबाबत भाजप खासदारांना सविस्तर मार्गदर्शन करतील. हे मतदान मतपत्रिकेद्वारे होणार आहे. त्यामुळे मत कसे द्यावे, मुर्मू यांच्या नावासमोर पहिल्या पसंतीचे मतदान कसे करावे इथपासून स्वतःच्या पेनने मतदान करू नये. राज्यसभा सचिवालयातर्फए दिल्या जाणाऱया पेननेच मतदान करा, इथपर्यंतच्या बारीकसारीक सूचना प्रात्यक्षिकांसाह देण्यात येतील. दरम्यान रविवारी (ता.१७) एनडीए बैठक होणार आहे. तीत भाजप मित्रपक्षांच्या नेत्यांनाही मतदानाबाबतची माहिती आपापल्या आमदार-खासदारांना देण्याबाबतच्या सूचना देण्यात येतील.
उपराष्ट्रपती पदासाठी कोण ?
भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळाची बैठकही येत्या शनिवारीच होत असून तीत उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या उमेदवारच्या नावावर मुख्यतः चर्चा होणार आहे. नुपूर शर्मा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम नेत्याला उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची भाजपच्या नेतृत्वाची ‘अंतस्थ' योजना असल्याचे सांगितले जाते. मात्र या कल्पनेला संघपरिवारातून कडाडून विरोध सुरू झाल्याचे समजते. संघाच्या छत्राखाली काही संघटनांच्या प्रमुख नेत्यांच्या गोटातून संघाचे भाजपमधील प्रतीनिधी बी एल संतोष यांच्यापर्यंत हा विरोध पोहोचविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आपली यावरील मन की बात ‘एलेव्हन्थ अवर' ला बदलणार काय, हाही उत्सुकतेचा विषय मानला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.