नवी दिल्ली : ‘चॅटजीपीटी’ची चर्चा सध्या जगभरात आहे. याद्वारे आपल्याला हवी माहिती अगदी मिळविता येते. जगाच्या पाठीवरील कोणत्याही विषय त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने पुढ्यात येतो. एवढेच नाही तर यातून कमाईही चांगली होऊ शकते, हे कर्नाटकमधील के. चंद्रिका यांच्या उदाहरणाने दाखवून दिले आहे.
त्यामुळेच या शिक्षिकेची कथा आणि तिच्यासारख्या अनेकांना अर्थार्जनाचा मार्ग खुला करून देणाऱ्या ‘कार्या’ या सामाजिक संस्थेची दखल अमेरिकेतील टाइम मासिकाने घेतली आहे. ‘एआय बाय द पीपल फॉर द पीपल’ अशा शीर्षकाची मुखपृष्ठ कथा या मासिकात झळकली आहे.
कर्नाटकमधील अलहळ्ळी गावातील शिक्षिका चंद्रिका (वय ३०) यांनी त्यांच्या स्मार्टफोनवरील ॲप वापरण्यास सुरुवात केली. त्यात मातृभाषेतील त्यांचे बोलणे ऐकायला मिळते. स्वतःच्या आवाजात त्यांनी त्यात ध्वनिमुद्रण केले आहे.
चंद्रिका यांना त्यातून पैसेही मिळू लागले आहेत. हे ॲप वापरण्यापूर्वी त्यांच्या बँक खात्यात फक्त १८४ रुपये होते. पण एप्रिल अखेरीस काही दिवस सुमारे सहा तासांच्या कामाच्या बदल्यात त्यांनी दोन हजार ५७० रुपयांची कमाई केली.
दूरवरील शाळेत शिक्षिका म्हणून काम करताना महिन्याभरात जेवढे पैस मिळतात तितकीच रक्कम त्यांनी कमी अवधीत व कमी श्रमात मिळाली. शिवाय यासाठी तीन बसने प्रवास करण्याची दगदग आणि पगारासाठी महिना संपण्याची वाट पाहणे असे काहीही न करता काही तासांत पैसे चंद्रिका यांच्या खात्यात जमा झाले.
यासाठी फक्त तिची मातृभाषा कन्नड भाषेतील मजकूर मोठ्याने वाचणे एवढेच काम त्यांना करावे लागते. यामुळे चंद्रिका यांच्यासारख्या भारतातील अनेक ग्रामीण नागरिकांसाठी हे भारतीय स्टार्टअपचे अॅप म्हणजे जणू क्रांतीच ठरले आहे.
या ॲपच्या माध्यमातून चंद्रिका एका तासाला ४०० रुपये कमवीत आहेत. आणखी काही दिवसांत आणखी पैसे त्यांना मिळू लागतील. ‘व्हॉइस क्लिप’ अचूक असल्याचे प्रमाणित झाल्यावर ५० टक्के बोनस दिला जातो, असे ‘टाइम’च्या लेखात म्हटले आहे.
केवळ आवाजाच्या माध्यमातून अर्थार्जन करण्याची वाट चंद्रिका यांना दाखविण्याचे श्रेय कृत्रिम बुद्धिमत्तेला (एआय) जाते. मात्र चॅटजीपीटीसारखे ‘एआय’ प्रणालीत सध्या इंग्रजीचाच वापर प्रामुख्याने केला जातो.
कन्नडसारख्या भारतातील अन्य भाषांचे खूप कमी पर्याय त्यावर आहेत. यामुळे स्थानिक भाषांतून माहिती एकत्रित करण्यासाठी प्रचंड मागणी आहे. या वाढत्या मागणीमुळे कोट्यवधी भारतीयांची मातृभाषा त्यांची संपत्ती ठरत आहे. सुमारे १.४ अब्ज लोकसंख्येच्या भारतात हिंदी, इंग्रजीसह २२ अधिकृत भाषा आणि ७८०पेक्षा जास्त स्थानिक भाषा बोलल्या जातात.
‘कार्या’ने बनविले ॲप
या सर्वांचा आढावा घेऊन बंगळूरमधील ‘कार्या’ या समाजसेवी संस्थेने गावांमध्ये पथदर्शी प्रकल्प अलहळ्ळी आणि चिलुकावाडी गावात राबविला आहे. चंद्रिकाही याचसाठी काम करतात. मायक्रोसॉफ्ट, एमआयटी आणि सँडफोर्ड अशा दिग्गज कंपन्या ‘कार्या’ची सेवा घेतात.
त्यातून मिळणाऱ्या पैशांतील मोठा हिस्सा ते देशातील ग्रामीण भागातील गरिबांसाठी खर्च करतात. त्यांनी एक ॲप तयार केले असून त्यावर कन्नड भाषेतील मजकूर ग्रामस्थांच्या आवाजात रेकॉर्ड केला जातो. यातून ग्रामस्थांना तासिका तत्त्वावर साधारण ४०० रुपये रोजगार मिळतो.
शिवाय ग्रामस्थांनी तयार केलेल्या मजकुराची मालकीही ‘कार्या’ने त्यांच्याकडे ठेवलेली आहे. हा मजकूर जेव्हा पुन्हा विकला जातो, तेव्हा तो तयार करणाऱ्याला जास्त पैसे मिळू शकतात. इतर कोणत्याही उद्योगात असे धोरण अस्तित्वात नाही, असे ‘टाइम’ने म्हटले आहे.
आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आधीच सांगतो, की हे कायमस्वरूपी काम नाही. मात्र झटपट पैसा मिळवून तुमच्या नेहमीच्या रोजगाराला हातभार लावण्यासाठी हा एक मार्ग आहे. या ॲपद्वारे एखादा कर्मचारी जास्तीत जास्त १.२ लाख रुपये कमाई करू शकतो. भारताचे सरासरी वार्षिक उत्पन्न तेवढेच आहे.
- मनू चोप्रा, सीईओ, कार्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.