नवी दिल्ली : बालकांना दत्तक घेण्यासाठी हजारो दाम्पत्ये रांगेत असतानाच बालके दत्तक देणाऱ्या सरकारी संस्थांमधील ८०० हून अधिक बालकांचा गेल्या चार वर्षांत मृत्यू झाल्याची बाब उघड झाली आहे. मृत्यू झालेल्यांपैकी बहुतांशी बालके दोन वर्षांखालील असल्याने सरकारी संस्थांमधील दुर्लक्षितपणाचे हे व्यथित करणारे चित्र समोर आले आहे. मात्र, या संस्थांमध्ये दाखल होतानाच काही बालके अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना वाचविणे कठिण असते, असे स्पष्टीकरण या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
सरकारी दत्तक संस्थांमधील बालकांच्या स्थितीबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अनेक जणांनी केलेल्या अर्जांना सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ऑथोरिटीने (कारा) दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. यानुसार, २०२१-२२ या वर्षात राज्य आणि केंद्र सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या दत्तक संस्थांमध्ये ११८ बालकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १०४ बालके दोन वर्षांखालील आहेत. गेल्या चार वर्षांत एकूण ८१९ बालकांपैकी ४८१ मुली होत्या, तर १२९ विशेष बालके होती. बालकांचा मृत्यू होण्यामागील कारणांमध्ये असुरक्षित वातावरण, कुत्र्यांनी चावा घेणे अशा काही कारणांचा समावेश आहे. बालकांना दत्तक देणाऱ्या सरकारी संस्थांमध्ये सहा वर्षांखालील बालके सांभाळली जातात. या वर्षी जून अखेरपर्यंत देशभरातील अशा संस्थांमध्ये सात हजारहून अधिक बालके रहात आहेत.
‘कारा’चे स्पष्टीकरण
बालके दत्तक देणाऱ्या सरकारी संस्थांमधील बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असले तरी यापैकी अनेक बालके बिकट अवस्थेतच संस्थांमध्ये आणली जातात, असे ‘कारा’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बालकांचा त्याग करताना पालक त्यांना असुरक्षित वातावरणात सोडून देतात. अशावेळी कुत्र्यांनी चावा घेतलेली बालके आढळून येतात. अशी बालके गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जीव वाचविणे कठिण असते, असे ‘कारा’च्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
बालकांच्या मृत्यूच्या प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास होणे आवश्यक आहे. दत्तक देण्याची प्रक्रिया अधिक सोपी केल्यास परिस्थिती सुधारू शकते.
- इनाक्षी गांगुली, बालहक्क कार्यकर्त्या
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.