नवी दिल्ली : घाऊक महागाईने तीस वर्षांचा उच्चांक तोडल्याने सरकारची चिंता वाढली आहे. महागाई रोखण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. परंतु, अर्थ मंत्रालयाच्या सुत्रांच्या म्हणण्यानुसार सरकारकडे कमाईचे अन्य साधन नसल्याने नजीकच्या काळात तरी उत्पादन शुल्कात घट होण्याची कोणतीही शक्यता नाही. मागील तेरा महिन्यांपासून दोन आकड्यांमध्ये असलेल्या घाऊक महागाईच्या दराने थेट १५.०८ टक्क्यांचा उच्चांक गाठल्याने सरकारची झोप उडाली आहे.
सध्याचा किरकोळ महागाईचा दरही मागील आठ वर्षांतील सर्वाधिक आहे. त्यातच इंधनाच्या दरात ३९ टक्क्यांनी वाढ झाल्याने महागाई भडकलेली असून अन्नधान्याचे दरही साडेआठ टक्क्यांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर दहा आणि पाच रुपयांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
जीएसटी बदल लांबण्याची चिन्हे
या महागाईमुळे सर्वसामान्यांचे गणित बिघडल्याने पाच टक्के जीएसटीच्या श्रेणीत असलेल्या सुमारे १३२ वस्तू १८ ते २८ टक्क्यांच्या श्रेणीत आणण्याचा निर्णय लांबणीवर पडू शकतो, असेही समजते. ज्याप्रमाणात महागाईचा दर चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे, ते पाहता जीएसटी कराचा टप्पा बदलण्याचा निर्णय आणखी त्रासदायक होईल असे सरकारचे म्हणणे आहे. जीएसटी वाढविण्याच्या प्रस्तावांतर्गत येणाऱ्या १४३ वस्तूंपैकी ९२ टक्के म्हणजे सुमारे १३२ वस्तूंमध्ये मध्ये गुळ, पापड, चष्मा, पादत्राणे, घड्याळ, ३२ इंचापेक्षा कमी आकाराचे टीव्ही यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
सरकार उदासीन आणि निष्क्रीय
वाढलेल्या महागाईवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर उदासिनता आणि निष्क्रियतेचा आरोप केला असून इंधनावरील दरवाढीला चाप लावण्यासाठी उत्पादन शुल्क कमी करावे, अशी मागणी केली आहे. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी कर्ज काढावे लागेल की काय, अशी भीती गरीब, मध्यमवर्गीयांमध्ये असल्याचा चिमटाही काँग्रेसने काढला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी ६००० कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावल्याच्या आकडेवारीमुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट करून सरकारवर टिका केली. ‘मध्यम वर्ग, गरीबांचे खर्च कमी होतील आणि कमाई वाढेल, असे एकही धोरण सरकारकडे नाही. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी कर्ज घ्यावे लागते की काय, असा भीती मध्यमवर्गीय आणि गरीबांमध्ये आहे,’ असे प्रियांकांनी म्हटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.