नवी दिल्ली : दिल्लीतील एका खासगी शिकवणी वर्गाच्या (कोचिंग सेंटर) तळघरात पाणी साचून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयाचे या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली असून शिकवणी वर्ग म्हणजे मृत्यूचे सापळे बनले असल्याची टिपणी केली आहे. संबंधित घटनेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिल्ली तसेच केंद्र सरकारला नोटीस जारी करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत.
‘‘खासगी शिकवणी वर्गांचे चालक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. अशा वर्गांसाठी सुरक्षेचे नियम लागू करण्यात आले आहेत का,’’ अशी विचारणा न्यायालयाने केंद्र व दिल्ली सरकारला केली. या प्रकरणात न्यायालयाची मदत करा, असे आदेश खंडपीठाने ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना दिले. शिकवणी वर्ग जर सुरक्षेचे नियम पाळत नसतील तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने वर्गांचे आयोजन केले पाहिजे, असे आमचे मत आहे. पण तूर्तास असा आदेश आम्ही जारी करत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
शिकवणी वर्गांमध्ये पुरेसा उजेड असणे, हवा येणे तसेच सुरक्षा मार्ग उपलब्ध असणे गरजेचे आहे, असे न्या. सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नमूद केले. जुन्या राजेंद्रनगरमध्ये असलेल्या राऊज आयएएस स्टडी केंद्राच्या तळघरात २७ जुलै रोजी अचानक पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले होते. यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.