माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळं मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल.
भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं असून, परिणामी तापमानातही वाढ झालीये. म्हणजेच.. जेव्हा माणूस निसर्गाच्या कामात अडथळा आणतो, तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास सुरुवात होत असते. डोंगरावर वसलेला जोशीमठ, नैनिताल, शिमला, चंपावत किंवा उत्तरकाशी हीच नाही तर समुद्राच्या काठावर वसलेली शहरंही बुडण्याची शक्यता आहे.
इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरनं (ISRO Space Application Centre) एक संशोधन अहवाल जारी केलाय. यामध्ये अहमदाबादसह (Ahmedabad) गुजरातचे अनेक किनारी भाग समुद्राच्या धूपामुळं (Sea Erosion) बुडतील, असं म्हटलंय. इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे शास्त्रज्ञ रतीश रामकृष्णन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून हा शोधनिबंध प्रसिध्द केलाय. याचं नाव, 'शोरलाइन चेंज अॅटलस ऑफ द इंडियन कोस्ट- गुजरात- दीव आणि दमण'. (Shoreline Change Atlas of the Indian Coast- Gujarat- Diu & Daman) आहे. गुजरातचा 1052 किलोमीटर लांबीचा किनारा स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र, 110 किलोमीटरचा किनारा कापला जात आहे. 49 किमीच्या किनारपट्टीवर हे अधिक वेगानं होत आहे, असं नमूद केलंय.
यामागं समुद्राची वाढती पातळी (Sea Level Rising) आणि हवामान बदल (Climate Change) ही प्रमुख कारणं असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. गाळामुळं गुजरातमध्ये 208 हेक्टर जमीन वाढलीये. पण, गुजरातची 313 हेक्टर जमीन समुद्राच्या धूपामुळं नष्ट झालीये.
कृणाल पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आणखी एक अभ्यास समोर आलाय. यामध्ये गुजरातच्या 42 वर्षांच्या भौगोलिक इतिहासाचा अभ्यास करण्यात आला आहे. कच्छ जिल्ह्यात सर्वाधिक समुद्राची धूप झाल्याचं सांगण्यात आलंय. सर्वाधिक म्हणजे, 45.9 टक्के जमिनीची धूप झालीये. पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातची चार जोखीम क्षेत्रात विभागणी केली होती. 785 किमी किनारपट्टीचे क्षेत्र उच्च जोखीम क्षेत्रात आणि 934 किमी क्षेत्र मध्यम ते कमी जोखीम श्रेणीमध्ये आहे. ही क्षेत्रं धोक्याच्या क्षेत्रात आहेत. कारण, इथं समुद्राच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत आहे.
संशोधनानुसार, गुजरातच्या 16 किनारी जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये धूप होत आहे. मुख्यतः कच्छमध्ये! यानंतर जामगानगर, भरूच आणि वलसाडमध्ये होत आहे. याचं कारण म्हणजे, खंभातच्या आखातातील समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 1.50 अंश सेल्सिअसनं वाढलं आहे. सौराष्ट्र किनार्याजवळ 1 अंश सेल्सिअसनं तर कच्छच्या खाडीत 0.75 अंश सेल्सिअसनं पारा वाढला आहे. गेल्या 160 वर्षांत तापमानात इतकी वाढ झालीये.
1969 मध्ये अहमदाबादच्या मांडवीपुरा गावातील 8000 आणि भावनगरच्या गुंडाला गावातील 800 लोकांना विस्थापित व्हावं लागले. कारण, त्यांची शेतजमीन आणि गावाचा काही भाग समुद्रात बुडाला होता. सामाजिक कार्यकर्ते प्रद्युमनसिंग चुडास्मा सांगतात, 'अहमदाबाद आणि भावनगरप्रमाणंच खंभातच्या खाडीच्या पश्चिम किनाऱ्यावरील गावांनाही धोका आहे. बावल्यारी, राजपूर, मिंगलपूर, खुन, झांखी, रहातलाव, कामा तलाव आणि नवागम ही सर्व गावं पावसाळ्यात पूर आल्यावर समुद्राच्या भरतीच्या वेळी रिकामी होतात.'
दक्षिण गुजरातमधील वलसाड आणि नवसारी जिल्ह्यातील अनेक गावांना असाच धोका आहे. उमरग्राम तालुक्यातील सुमारे 15 हजार लोकांचा जीव आणि व्यवसाय धोक्यात आला आहे. कारण, समुद्राचं पाणी त्यांच्या घरात शिरत आहे. दमण प्रशासनानं ज्या पद्धतीनं 7 ते 10 किलोमीटर लांबीची संरक्षण भिंत बांधलीये, तशीच गुजरात सरकारनं 22 किलोमीटर लांबीची संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी उमरग्राम तालुका पंचायतीचे माजी प्रमुख सचिन माच्छी यांनी केली. या सर्व गावांना समुद्राची पातळी वाढल्यामुळं बुडण्याचा धोका आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजी रिसर्चचे शास्त्रज्ञ राकेश धुमका यांच्या अभ्यासानुसार, अहमदाबाद दरवर्षी 12 ते 25 मिमी म्हणजेच 1.25 ते 2.5 सेमीनं बुडत आहे. त्याचं कारण म्हणजे, भूजलाचा जलद उपसा. भूगर्भातील पाणी उपसण्यावर बंदी घालावी. लोकांनी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, असं त्यांचं म्हणणं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.