Recruitment in IT Sector: देशात चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी भरती मंदावली असली, तरी डेव्हलपमेंट, मनुष्यबळ नियोजन, वाहनांचे डिझाइन, चाचणी आणि व्यवस्थापन आदी क्षेत्रांसाठी आवश्यक कार्यात्मक कौशल्यांना मोठी मागणी आहे, असे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी भरती आणि व्यावसायिक उपाययोजना सेवा देणाऱ्या बंगळूरस्थित ‘क्वेस कॉर्प’ कंपनीच्या अहवालात म्हटले आहे.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात विविध तांत्रिक कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीत ३६ टक्के वाढ झाली असून, जावा, डॉट नेटसारख्या कौशल्यांचे वर्चस्व कायम आहे. त्यासह बँकिंग, सल्लासेवा, तंत्रज्ञान, दूरसंचार आणि वाहन क्षेत्रात मोठी मागणी दिसून आली, मात्र कंपन्यांकडील कामाची मागणी कमी झाल्याने माहिती तंत्रज्ञान सेवांमधील नोकरभरती मंदावली आहे, असे कंपनीच्या कौशल्य अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.(Latest Marathi News)
गेल्या काही तिमाहींमध्ये अनेक कंपन्यांनी नवी कर्मचारी भरती कमी केली आहे किंवा भरती पुढे ढकलली आहे. कंपन्यांकडील काम कमी झाल्याने अनअनुभवी उमेदवारांची नियुक्ती पुढे ढकलण्याचा किंवा ती न करण्याचा धोरणात्मक निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. कंपन्या त्यांच्या दीर्घकालीन प्रकल्प आणि विस्तार योजनांमध्ये नवी नियुक्ती करताना अल्प-मुदतीच्या खर्चाला प्राधान्य देऊन खर्चाचे व्यवस्थापन करत आहेत, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याच्या जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणावांमुळे बहुसंख्य कंपन्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतीक्षा करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे कर्मचारी भरती थंडावली आहे. बड्या आयटी कंपन्यांनी दुसर्या तिमाहीतील आर्थिक निकालांबाबत केलेल्या भाष्याशी हे सुसंगत आहे. दुसऱ्या तिमाहीत, अभियांत्रिकी, उत्पादन, आरोग्यसेवा आणि रिटेल यांसारख्या क्षेत्रात मागणीत लक्षणीय वाढ दिसून आली. डेटा अभियांत्रिकी, विकास (जावा, अँगुलर), ईआरपी, पॉवर बीआय, नेटवर्क अभियांत्रिकी, सायबरसुरक्षा आदींशी संबंधित कौशल्ये नव्या उमेदवारांकडून अपेक्षित
आहेत. अनेक प्रमुख तंत्रज्ञान, सल्लासेवा आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील (एफएमसीजी) कंपन्या अनअनुभवी कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण आणि त्यांचे व्यावसायिक व तांत्रिक कौशल्ये वाढविण्याच्या उद्देशाने विशेष उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवित आहेत. हा सकारात्मक कल आहे. तसेच जनरल एआय आणि त्यासाठी वाढती परिसंस्था यामुळे भारतीय आयटी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाची अपेक्षा आहे, ज्यात दीर्घकालीन क्षमता आहे, असे विजय शिवराम यांनी सांगितले. (Latest Marathi News)
छोटी शहरे बनत आहेत ‘टेक हब’
देशात आयटी क्षेत्रामध्ये लक्षणीय परिवर्तन होत आहे कारण पुणे, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, बंगळुर आणि एनसीआरसारख्या शहरांच्या पलीकडे छोटी शहरेही नवी ‘टेक हब’ म्हणून उदयास येत आहेत. या पहिल्या पाच शहरांचा कर्मचारी भरतीत ७९ टक्क्यांपेक्षा अधिक वाटा असला, तरी पायाभूत सुविधांचा जलद विकास, कौशल्य विविधता, दूरस्थ पद्धतीने काम करण्याची सुविधा आणि स्मार्ट शहरांसारख्या सरकारी उपक्रमांमुळे अहमदाबाद, म्हैसूर, जयपूर, इंदूर, कोईम्बतूर, कोची आदी टिअर दोन आणि तीन श्रेणीतील शहरांमध्ये आयटीतील नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीमुळे हा बदल होत असून, छोट्या शहरांमध्ये संधी वाढत आहे.
सध्या व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल होत आहेत. आता कौशल्ये वाढविण्यासाठी गुंतवणूक करणार्यांकरिता भरपूर संधी आहेत, कारण ८५ टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय व्यवसाय पुढील दोन वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’मध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. नोकऱ्यांच्या क्षेत्रातील ही अनिश्चितता आणखी एक किंवा दोन वर्षे कायम राहील. त्यानंतर पुन्हा कर्मचारी भरती वाढेल. (Latest Marathi News)
- विजय शिवराम,
सीईओ, क्वेस आयटी स्टाफिंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.